आदेशाला केराची टोपली

By admin | Published: October 12, 2016 01:58 AM2016-10-12T01:58:22+5:302016-10-12T01:58:22+5:30

वाहनाच्या आतील काही दिसू नये, यासाठी शहरातील असंख्य वाहनांना काळ्या फिल्म लावल्या जात आहेत. मात्र, वाहतूक पोलिसांचे याकडे दुर्लक्ष

Order kerachi basket | आदेशाला केराची टोपली

आदेशाला केराची टोपली

Next

रावेत : वाहनाच्या आतील काही दिसू नये, यासाठी शहरातील असंख्य वाहनांना काळ्या फिल्म लावल्या जात आहेत. मात्र, वाहतूक पोलिसांचे याकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे. अशा गाड्यांचा वापर करून काही समाजकंटक विघातक कृत्य करू शकतात. त्यामुळे प्रादेशिक परिवहन अधिकारी आणि वाहतूक पोलिसांनी अशा वाहनांवर कारवाई करण्याची मागणी नागरिक करीत आहेत.
वाहनांच्या खिडक्यांवरील काचांवर फिल्मिंग करण्यावर सर्वोच्च न्यायालयाने बंदी घातली आहे. मात्र, तरीही शहरातील बहुतांश वाहनधारकांनी या आदेशाला केराची टोपली दाखविल्याचे चित्र आहे. सामान्य नागरिकांसोबतच राजकीय नेते, उद्योजक आणि शासकीय अधिकारी यांच्या गाड्यांनाही काळ्या फिल्म अद्याप कायम असल्याचे पाहावयास मिळते.
नियमानुसार, उत्पादकाने बसविलेल्या काचांवर कुठल्याही प्रकारची फिल्म बसविणे कायद्याने गुन्हा आहे. तरीसुद्धा त्याची पर्वा न करता वाहनचालक फिल्म चिटकवितात. यामुळे वाहनाच्या आत कोण बसले आहे, हे बाहेरून दिसू शकत नाही. याचा उपयोग समाजविघातक कृत्यासाठी केला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाने अशा वाहनांविरुद्ध कारवाई करणे आवश्यक आहे .
केंद्रीय मोटार वाहन कायदा १९८९मधील नियम १००(२) नुसार वाहनाच्या समोरील व मागील काचेची पारदर्शकता ७० टक्के पेक्षा अधिक, तर खिडक्यांच्या काचेची पारदर्शकता ५०टक्केपेक्षा अधिक असणे आवश्यक आहे. परंतु, असे असले तरी कंपनीतून वाहन बाहेर पडताच वाहनचालक गाडीच्या आतील भाग दिसू नये, यासाठी काळ्या रंगाच्या फिल्म चिकटवितात. अशा दोषी आढळलेल्या वाहनांवर दंडात्मक कारवाई केव्हा होणार, असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे.
३ आॅगस्ट २०१२ रोजी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशान्वये चारचाकी वाहनांच्या काचांवरती कोणत्याही प्रकारच्या फिल्म लावण्यात येऊ नये, असा आदेश असताना अनेक चारचाकी वाहनांच्या काचावर गडद काळ्या रंगांच्या फिल्म बिनधास्तपणे लावल्या जातात.
शहरामध्ये चोरीच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. चोरटे काळ्या काचांच्या गाड्यांचा वापर करीत असल्याची चर्चा आहे. त्यामुळे काळ्या काचा असणाऱ्या वाहनांवर पोलिसांनी कारवाई करण्याची आवश्यकता आहे. परंतु, पोलीस त्याकडे दुर्लक्ष करतात, असा नागरिकांचा आरोप आहे. शहरामध्ये अनेक राजकीय नेत्यांच्या गाड्यांना काळ्या काचा आहेत.
या गाड्या पोलीस ठाण्याच्या समोर उभ्या केल्या जातात. परंतु, त्याकडे पोलीस दुर्लक्ष करीत आहेत. काही पोलिसांच्या गाड्यांनाही काळ्या काचा आहेत. कुंपणच शेत खात असेल तर तक्रार कोणाकडे करायची, असा प्रश्न नागरिकांसमोर आहे. अशा वाहनांवर पोलीस कारवाई करणार की नाही, असा प्रश्न विचारला जात आहे. (वार्ताहर)

Web Title: Order kerachi basket

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.