बोपखेल रस्त्यासाठी लष्कराला जागा देण्याचा अहवाल १५ दिवसांत सादर करण्याचा आदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2019 12:58 AM2019-01-12T00:58:42+5:302019-01-12T00:59:01+5:30
प्रधान सचिव : मुख्यमंत्र्यांसमवेत अधिकारी, पदाधिकाऱ्यांची मुंबईत बैैठक
पिंपरी : बोपखेलसाठी मुळा नदीवर पूल आणि रस्त्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेला लष्कराची चार एकर जागा आवश्यक आहे. या जागेच्या बदल्यात जागा उपलब्ध करून देण्यात येणार असून, पुणे किंवा पिंपरी-चिंचवडच्या हद्दीत लष्कराला जागा देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. कोणती जागा द्यायची याबाबत १५ दिवसांत अहवाल सादर करण्याचा आदेश राज्याच्या महसूल विभागाचे प्रधान सचिव मनुकुमार श्रीवास्तव यांनी पुण्याचे जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांना दिला आहे.
महापालिका हद्दीतील बोपखेलचे नागरिक दापोडीतील सीएमईच्या हद्दीतील रस्त्याचा रहदारीसाठी वापर करीत होते. मात्र, सीएमईने हा रस्ता वाहतुकीसाठी बंद केल्याने बोपखेलवासीयांना मोठा वळसा घालावा लागत होता. त्यामुळे पिंपरी-चिंचवड महापालिकेने मुळा नदीवर बोपखेल आणि खडकीला जोडणारा पूल उभारण्याचा आणि रस्ता करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी महापालिकेच्या अर्थसंकल्पात आवश्यक खर्चाची तरतूदही केली. लष्कराने अगोदर या जागेचा मोबदला मागितला. जागामोजणीनंतर बाजारभावानुसार २५ कोटी ८१ लाख रुपये देण्यास महापालिकेने तयारी दर्शविली. त्यानंतर लष्कराने जागेच्या मोबदल्यात जागेचीच मागणी केली आहे. त्यानंतर भाजपा शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप, नगरसेविका हिराबाई घुले, शिक्षण मंडळाचे माजी सभापती चेतन घुले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. त्या वेळी फडणवीस यांनी महसूल विभागाचे प्रधान सचिव मनुकुमार श्रीवास्तव यांना बोपखेलचा प्रश्न तातडीने सोडवण्याचा आदेश दिला. या संदर्भात मुंबईला बैठक झाली.
महापालिका हद्दीतील दिघी, मामुर्डी, पुणे महापालिका हद्दीतील वानवडी, औंध, वाघोली, भावडी या परिसरातील सरकारच्या अनेक जागा लष्कराला भाडे कराराने दिल्या आहेत. त्यांपैकी एखादी जागा लष्कराला द्यावी, यावर चर्चा झाली. याविषयी जिल्हाधिकाºयांना सूचना दिल्या आहेत. - श्रावण हर्डीकर, आयुक्त
लष्कराला कोणती जागा देता येईल याबाबतचा अहवाल १५ दिवसांत सादर करण्याचा आदेश जिल्हा-धिकाºयांना
दिले आहेत. त्यामुळे बोपखेल रस्त्याचा प्रश्न लवकर
सुटणार आहे. जिल्हाधिकाºयांचा अहवाल आल्यानंतर
त्यावर तातडीने रस्त्याचे
काम सुरू करू.
- लक्ष्मण जगताप, आमदार