आमची जमीन रस्त्यात गेली, महिलेने वसूल केली खंडणी
By रोशन मोरे | Updated: December 3, 2023 17:50 IST2023-12-03T17:49:13+5:302023-12-03T17:50:14+5:30
आमच्या जमिनी रोडमध्ये गेल्या त्यामुळे दररोज ५०० रुपये द्यायचे. तरच येथे हातगाडी लावायची. अन्यथा तुझ्याकडे बघते, अशी धमकी दिली

आमची जमीन रस्त्यात गेली, महिलेने वसूल केली खंडणी
पिंपरी : आमची जमीन रस्त्यात गेली आहे. तू रस्त्याच्या कडेला भाजीचा धंदा करतोस याची तक्रार पालिकेच्या अतिक्रमण विभागाकडे करेल, अशी धमकी देऊन महिलेने भाजी विक्रेत्याकडून ४० हजारांची खंडणी वसूल केली. ही घटना ऑगस्ट २०२३ ते ३० नोव्हेंबर २०२३ या कालावधीत मोहननगर येथे घडली. याप्रकरणी राजेश अशोक रांगोळे (वय २५, रा. सुसगाव) यांनी हिंजवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी खंडणी वसूल करणाऱ्या महिलेविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार: संशयित महिलेने फिर्यादी राजेश यांच्या भाजीपाला विक्रीच्या हातगाडीवर येऊन तसेच फोन करून खंडणीची मागणी केली. भाजीपाल्याची गाडी फिर्यादी हे फुटपाथवर लावतात, त्यामुळे त्यांची तक्रार महापालिकेकडे करण्याची धमकी संशयित महिलेने दिली. तसेच, आम्ही स्थानिक आहोत. आमच्या जमिनी रोडमध्ये गेल्या त्यामुळे दररोज ५०० रुपये द्यायचे. तरच येथे हातगाडी लावायची. अन्यथा तुझ्याकडे बघते, अशी धमकी दिली. त्यानंतर वेळेवेळी फिर्यादी राजेश यांच्याकडून संशयित महिलेने ४० हजार रुपये खंडणी स्वरुपात घेतले. तसेच आणखी खंडणीची मागणी केली.