१३५ पैकी १६ उद्यानांनाच वाहनतळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2019 02:54 AM2019-01-30T02:54:36+5:302019-01-30T02:54:55+5:30

उद्यानांसाठी पार्किंगची व्यवस्थाच नाही; महापालिकेच्या उद्यान विभागाची उदासीनता

Out of 135 parks, only 16 are parked | १३५ पैकी १६ उद्यानांनाच वाहनतळ

१३५ पैकी १६ उद्यानांनाच वाहनतळ

Next

- प्रकाश गायकर 

पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहर हे उद्यानांचे शहर म्हणून ओळखले जाते. शहरामध्ये अनेक छोटी-मोठी उद्याने विकसित करण्यात आली आहेत. मात्र या उद्यानांमध्ये नागरिकांना सोयी-सुविधा देण्यासाठी उद्यान प्रशासन असमर्थ ठरताना दिसत आहे. शहरामध्ये एकूण १३५ सार्वजनिक उद्याने आहेत. त्यापैकी केवळ १६ उद्यानांनाच वाहनतळाची सोय करण्यात आली असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. उर्वरित सर्वच उद्यानांमध्ये नागरिकांना वाहने बेभरवश्यावर सोडावी लागत आहेत.

दिवसेंदिवस पिंपरी-चिंचवड शहराचा विस्तार होत आहे. वाढत्या शहरीकरणाबरोबरच शहरातील वाढत्या वाहनांच्या वाहनतळाचा प्रश्नही गंभीर होत आहे. उद्यानांमध्ये वाहनतळाअभावी नागरिकांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. महापालिकेने शहरातील विविध भागात सुमारे १३५ सार्वजनिक व प्रशस्त उद्यानांची निर्मिती केली आहे. मात्र असे असताना त्या उद्यानांना वाहनतळाची सुविधा देण्याकडे महापालिका प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे. ज्या थोड्या बहुत ठिकाणी वाहनतळाची सुविधा आहे तेथेही नागरिकांना समस्यांचा सामना करावा लागत आहे. जागा तोकडी असल्याने अनेक वेळा वाहतुककोंडी व त्यातून होणाऱ्या वादांचा सामना करावा लागत आहे. परिणामी उद्यानांना भेट देताना नागरिकांना ‘उद्यानाला भेट नको रे बाबा’ असे म्हणण्याची वेळ आली आहे.

अनेक उद्याने ही रहिवाशी परिसरामध्ये आहेत. त्यामुळे उद्यान परिसरातील रहिवाशांना वाहनतळाअभावी होणाºया गोंगाटाचा त्रास सहन करावा लागतो. महापालिका कोट्यावधी रुपये खर्च करून उद्यानांची निर्मिती करत आहे. मात्र भौतिक सुविधा देण्याकडे दुर्लक्ष केल्याने उद्यानांची रया जात आहे. दिवसेंदिवस वाहतुककोंडीची समस्या उग्र रुप धारण करत असताना उद्यानांना प्रशासनाने वाहनतळाची सोय करण्याची मागणी नागरिक करत आहेत.

कारवाई : आर्थिक भुर्दंडासह मानसिक ताणही
उद्यानात जाऊन थोडावेळ विरंगुळा करावा, सुट्टी आनंदात घालवावी असा विचार करून नागरिक उद्यानांमध्ये जातात. मात्र सोबत नेलेले वाहन कुठे उभे करायचे हा प्रश्न पडतो. रस्त्यावर आपले वाहन लावून उद्यानातून परतल्यावर बºयाचदा दुचाकी वाहन वाहतूक पोलिसांनी नेलेले असते. तर चारचाकींना जॅमर लावलेले असते. त्यामुळे निसर्गाच्या सानिध्यात घालविलेल्या आनंदाच्या क्षणांंवर विरजण पडते. वाहन सोडविण्यासाठी अर्थिक भुर्दंड सहन करावा लागतो. त्याचबरोबर मानसिक ताण सहन करावा लागतो तो वेगळाच. त्यामुळे उद्यानांना भेट न दिलेलीच बरी, अशी प्रतिक्रिया अनेक नागरिकांनी व्यक्त केली.

उद्यान विभागाच्या अखत्यारित वाहनतळाचा विषय येत नाही. त्यामुळे त्याबद्दल काही सांगता येणार नाही. आमच्याकडे उद्यानाची निर्मिती झाल्यानंतर त्याची देखभाल करणे ही जबाबदारी आहे.
- सुरेश साळुंखे, मुख्य अधीक्षक, उद्यान विभाग, महापालिका

Web Title: Out of 135 parks, only 16 are parked

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.