सीमा सावळेंसह ८ जण बाहेर, भाजपाने घेतले १० सदस्यांचे राजीनामे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 8, 2018 01:23 AM2018-02-08T01:23:05+5:302018-02-08T01:23:12+5:30
पिंपरी-चिंचवड महापालिका स्थायी समिती सभापती सीमा सावळेंसह भाजपा, राष्टÑवादी काँग्रेसचे आठ जण बाहेर पडले असून, त्या जागी कोणाची वर्णी लागणार याबाबत उत्सुकता आहे.
पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिका स्थायी समिती सभापती सीमा सावळेंसह भाजपा, राष्टÑवादी काँग्रेसचे आठ जण बाहेर पडले असून, त्या जागी कोणाची वर्णी लागणार याबाबत उत्सुकता आहे. सत्ताधारी भाजपाने समितीतील सर्व सदस्यांचे राजीनामे घेतले आहेत.
महापालिका स्थायी समितीमध्ये १६ सदस्य आहेत. यामध्ये भाजपाचे दहा, राष्ट्रवादीचे चार, शिवसेनेचा एक व अपक्ष एक असे सदस्य आहेत. सार्वत्रिक निवडणुकीनंतर त्यातील पहिले आठ सदस्य पहिल्या वर्षानंतर बाहेर पडतात. ही नावे चिठ्ठी काढून निश्चित केले जातात. बुधवारच्या स्थायी सभेत सदस्यांचा ‘ड्रॉ’ काढण्याचे नियोजन प्रशासनाने केले होते. परंतु, सभा दुपारी २ वाजता होणार होती. स्थायीतील भाजपा नगरसेवकांमध्ये चर्चेची खलबते सुरू होती. भाजपातील काही सदस्य राजीनामे देण्यास उत्सुक नसल्याचीही चर्चा रंगली होती. त्यामुळेच सभेला उशीर झाल्याची चर्चा होती.
पहिल्याच चिठ्ठीत अध्यक्षांची विकेट
समितीच्या आठ सदस्यांना चिठ्ठी सोडतीद्वारे बाहेर पडावे लागले आहे. लकी ड्रॉ मध्ये सभापतीचे काय होणार? अशी चर्चा महापालिका वर्तुळात होती. पहिल्याच चिठ्ठीने स्थायी समिती सभापती सीमा सावळे यांची पहिलीच ‘विकेट’ घेतली. सभेच्या सुरुवातीलाच ‘पारदर्शकपणे’ पत्रकारांच्या हस्ते ही सोडत काढली. त्यात सावळेंसह, कुंदन गायकवाड, उषा मुंडे, हर्षल ढोरे, आशा शेंडगे, कोमल मेवाणी या भाजपाच्या सहा, तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनुराधा गोफणे, वैशाली काळभोर यांच्या नावाच्या चिठ्ठया निघाल्या. त्यामुळे हे सदस्य केवळ २८ फेब्रुवारीपर्यंतच राहणार आहेत. तर लकी ड्रॉमध्ये भाजपाचे लक्ष्मण उंडे, प्रा. उत्तम केंदळे, माधुरी कुलकर्णी, निर्मला कुटे तर राष्टÑवादीचे मोरेश्वर भोंडवे, राजू मिसाळ आणि शिवसेनेचे अमित गावडे, अपक्षांचे गटनेते कैलास बारणे हे लकी ठरले आहेत. सलग दुसºया वर्षी स्थायी समितीत काम करण्याची संधी त्यांना मिळणार आहे.
>स्थायी समितीवर अधिक सदस्यांना काम करण्याची संधी देण्यात यावी, अशी महापालिकेतील सर्व सदस्यांची मागणी होती. त्यानुसार स्थानिकपातळीवर एकमत झाले आणि सध्याच्या समितीतील सदस्यांनी आपले राजीनामे दिले आहेत. स्थानिक पातळीवरील प्रस्तावावर पक्षश्रेष्ठींचे मत घेतले जाणार आहे. याबाबतचा अंतिम निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पालकमंत्री गिरीश बापट घेणार आहेत.
- लक्ष्मण जगताप, भाजपा शहराध्यक्ष