शालाबाह्य मुलांना दिला शाळेत प्रवेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 6, 2019 01:50 AM2019-01-06T01:50:20+5:302019-01-06T01:50:47+5:30
अतुल क्षीरसागर रावेत : शहरातील शाळाबाह्य मुलांना मुख्य शैक्षणिक प्रवाहात आणण्यासाठी महापालिकेतर्फे प्रयत्न करण्यात येत आहेत. झोपडपट्ट्या, बांधकामाची ठिकाणे, ...
अतुल क्षीरसागर
रावेत : शहरातील शाळाबाह्य मुलांना मुख्य शैक्षणिक प्रवाहात आणण्यासाठी महापालिकेतर्फे प्रयत्न करण्यात येत आहेत. झोपडपट्ट्या, बांधकामाची ठिकाणे, वीटभट्ट्या, खाणी या ठिकाणी जाऊन तेथील बहुतांश मुलांना शिक्षणाकडे वळविण्यात महापालिका प्रशासनाला यश आले आहे.
राज्यात बालकांना मोफत व सक्तीचे शिक्षण देणाची तरतूद असलेल्या कायद्याची अंमलबजावणी मागील काही वर्षांपासून सुरू आहे. त्यानुसार प्रत्येक मुलाला शिक्षणाचा अधिकार आहे़ या भावनेने शासनाने शालाबाह्य मुलांना प्रवेश देण्याचा निर्णय दिला आहे.
रावेत येथे सहगामी फाउंडेशनच्या वतीने चालविण्यात येत असलेल्या मस्ती की पाठशाळा या शाळेतील बांधकाम मजुरांच्या शालाबाह्य दहा मुलांची रावेत येथील महापालिकेच्या शाळा क्र. ९७ मध्ये प्रवेश देण्यात आला. जन्म तारखेचा दाखला नसलेल्या सर्व शालाबाह्य मुलांना मुख्य शैक्षणिक प्रवाहात आणण्यात आले. घरची बिकट परिस्थिती, लहानांना सांभाळण्याची जबाबदारी, पालकांची शिक्षणाबाबतची अनास्था, मातृभाषेतील अडचण, पालकांमधील वाद, अशा विविध कारणांमुळे मुले शिक्षणांपासून वंचित राहू नयेत म्हणून ही मोहीम हाती घेतली आहे. मुलांच्या वस्तीमध्ये मस्ती की पाठशाला चालविली जाते. या पाठशाळेचा मुख्य उद्देश पालकांना शिक्षणाचे महत्त्व पटवून देणे व मुलांना शिक्षण देणे हाच आहे. शालाबाह्य मुलांच्या प्रवेशासाठी सहगामी फाउंडेशनच्या प्राजक्ता रुद्रवार, केतकी नायडू, रोशनी राय यांनी विशेष परिश्रम घेतले. महापालिकेच्या शिक्षण उपसभापती शर्मिला बाबर यांनी मस्ती की पाठशाळा या शाळेस भेट देऊन या उपक्रमाचे कौतुक केले. अशाप्रकारे मुलांना शाळेत दाखल केल्यास शिकून त्यांचे भविष्य उज्ज्वल होण्यास मदतच होईल. शासनच्या निर्णयानुसार शाळा प्रवेशासाठी जन्मतारखेच्या पुराव्याची आवश्यकता नसल्याने मुलांच्या वयाचा अंदाज घेऊन त्यांना शाळेत प्रवेश दिला जाणार आहे, असे शर्मिला बाबर म्हणाल्या.
शासनाच्या आरटीईच्या नियमानुसार मुलांच्या वयोगटासाठी पालकांचे प्रतिज्ञापत्र लिहून घेण्यात आले आहे. प्रतिज्ञापत्रानुसार या १० मुलांना रावेतच्या शाळा क्रमांक ९७ मध्ये प्रवेश देण्यात आला आहे. ही सर्व मुले ६ ते १० वयोगटातील आहेत. त्यामुळे त्यांना पहिली ते चौथीपर्यंतच्या वर्गात प्रवेश देण्यात आला आहे. ही मुले नियमित शाळेला येत आहेत. त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद शिकण्याची प्रबळ इच्छा दाखवतो.
- साहेबराव सुपे, मुख्याध्यापक,
महापालिका शाळा क्र. ९७, रावेत
आई-वडील एका जागी कायमचे किंवा जास्त दिवस वास्तव्य करत नसल्यामुळे बांधकाम मजुरांच्या मुलांचे शिक्षण घेण्याचे प्रमाण खूप कमी आहे. पण या मुलांच्या भवितव्याच्या दृष्टीने त्यांना शिकवून प्रवाहात आणणे खूप जरुरी आहे. त्यासाठी आम्ही अशा मुलांना त्यांच्या वस्तीमध्ये जाऊन पालकांना शिक्षणाचे महत्त्व पटवून देतो. तसेच या मुलांचा जवळपासच्या महापालिकेच्या शाळेत प्रवेश करून देतो. प्रवेशानंतर मुलांना इतर मुलांसोबत शाळेत बरोबरीने अभ्यास करता यावा म्हणून त्यांना ‘मस्ती की पाठशाला’ या उपक्रमातून शिक्षणाचे धडे देत आहोत.
- प्राजक्ता रुद्रवार, सहगामी फाउंडेशन,
मस्ती की पाठशाला
चालू शैक्षणिक वर्षात शहर परिसरात शालाबाह्य असणाºया जवळपास ७०० विद्यार्थ्यांना महापालिकेच्या विविध शाळांमध्ये शासनाच्या आरटीई नियमानुसार प्रवेश देण्यात आले आहेत. यासाठी विशेष शालाबाह्य विद्यार्थी शोधमोहीम राबविण्यात आली. शाळा परिसरामध्ये गृहभेटी, वीटभट्टी कामगार, सिग्नलवर थांबणारी मुले, बांधकाम परिसर भागात सर्वेक्षण करण्यात आले. शिक्षकांची बालरक्षक कार्यशाळा घेण्यात आली. या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य पुरविण्यात आले आहे. शाळेपासूनचे घराचे अंतर अधिक आहे, अशा विद्यार्थ्यांसाठी बस सुविधा पुरविण्यात आली आहे. - ज्योत्स्ना शिंदे, प्रशासन अधिकारी, शिक्षण मंडळ, महापालिका