मोबाइलच्या जमान्यात मैदानी खेळ गायब
By Admin | Published: July 5, 2017 03:14 AM2017-07-05T03:14:32+5:302017-07-05T03:14:32+5:30
सध्याचा युग हे माहिती-तंत्रज्ञानाचे म्हणजेच संगणक आणि मोबाइल अॅप्लिकेशनचे आहे. माहिती-तंत्रज्ञानाच्या संगणक आणि मोबाइल
लोकमत न्यूज नेटवर्क
तळवडे : सध्याचा युग हे माहिती-तंत्रज्ञानाचे म्हणजेच संगणक आणि मोबाइल अॅप्लिकेशनचे आहे. माहिती-तंत्रज्ञानाच्या संगणक आणि मोबाइल या संसाधनांनी सर्वच क्षेत्र व्यापून टाकली आहेत. आज घराघरांत एकापेक्षा जास्त अॅण्ड्रॉईड फोन असून, घरातील सर्वजण त्याचा सराईतपणे वापर करताना दिसत आहेत.
परंतु कोणत्याही तंत्रज्ञानाचे चांगले आणि वाईट परिणाम असतात, तसेच आता हळूहळू मोबाइलचे वाईट परिणाम दिसून येत आहेत. यामध्ये प्रामुख्याने तरुण वर्ग आणि लहान मुले यांना मोबाइलचे जणूकाही व्यसन जडले असल्याचे चित्र बघायला मिळत आहे.
सकाळी उठल्या उठल्या मोबाइल हातात घेऊन तपासणी केल्याशिवाय पुढील कोणतेही काम होत नाही. तासातासाला मोबाइलची तपासणी केली जाते. एखाद्या वेळेस मोबाइल जवळ नसल्यास चैन पडत नाही. ही आणि अशी अनेक उदाहरणे याबाबत सांगता येतील.
लहान मुलांना तर मोबाइल गेमचे एवढे वेड लागले आहे की, जवळपास मोबाइल दिसल्यास लगेच त्यात कोणकोणत्या नवीन गेम आहेत या विषयी चौकशी ते करीत असतात. पाहुणे घरात आल्यावर त्यांच्याकडे कोणता मोबाइल आहे याबाबत लहानांकडून विचारणा होत असते. यामुळे घरातील थोरामोठ्यांना मात्र ओशाळल्यासारखे होते.
पालकांचा प्रश्न :
तंत्रज्ञान शाप की वरदान
हल्ली मैदानी खेळ खेळल्याने अंग दुखत असल्याच्या तक्रारी मुले करीत आहेत. कारण त्यांना मैदानी खेळ खेळण्याची सवय राहिली नाही. त्यांना मोबाइलवर खोट्या खोट्या पण खऱ्याचा आभास निर्माण करणाऱ्या गेम आवडत आहेत. मुले नेहमी एकटे कोपऱ्यात बसून मोबाइलवर गेम खेळत असल्याचे चित्र घरोघरी बघायला मिळत आहे. त्यामुळे त्यांच्यात एकलकोंडेपणा वाढत असल्याचे तज्ज्ञ सांगतात.
कधी काळी गावच्या चावडीत, चाळीमध्ये, गल्लीत खेळले जाणारे लपाछपी आणि चोर-पोलीस यांसारखे सामूहिक खेळ लुप्त होत असून, त्याऐवजी मोबाइलचा हॉटस्पॉट चालू करून पाच-सहा जणांचा ग्रुप करून सामूहिक मोबाइल गेम खेळणाऱ्या मुलांचा समूह जागोजागी दिसतात.