चिखलीत गाववाले विरुद्ध बाहेरचे
By admin | Published: February 18, 2017 03:24 AM2017-02-18T03:24:21+5:302017-02-18T03:24:21+5:30
चिखली गावठाण, मोरेवस्ती प्रभाग क्रमांक १ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार दत्ता साने, तसेच त्यांचे पारंपरिक प्रतिस्पर्धी शिवसेनेचे नेताजी काशीद
पिंपरी : चिखली गावठाण, मोरेवस्ती प्रभाग क्रमांक १ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार दत्ता साने, तसेच त्यांचे पारंपरिक प्रतिस्पर्धी शिवसेनेचे नेताजी काशीद यांची लढत लक्षवेधी ठरणार आहे. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या विद्यमान नरगसेविका स्वाती प्रमोद साने यांच्याशी भाजपाच्या स्वीनल म्हेत्रे यांची लढत लक्षवेधी होणार आहे. या प्रभागात विद्यमान आणि नवखे अशी लढत दिसून येत असून, विकासकामांचा मुद्दा निर्णायक ठरणार असे बोलले जात आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान नगरसेवक दत्ता साने, स्वाती साने यांच्या पॅनलमध्ये सोनम मोरे हे उमेदवार तसेच सतीश विठ्ठल दिघे हे पुरस्कृत उमेदवार आहेत. या परिसरात आरक्षणांचा विकास झाला नाही, याच मुद्द्याचे भांडवल विरोधक करत आहेत. परंतु चिखली परिसर महापालिका हद्दीत नव्याने समाविष्ट झालेला भाग आहे. वाढत्या लोकसंख्येची पाणी पुरवठ्याची गरज लक्षात घेऊन या भागात पाण्याची टाकी उभारली आहे. गोरगरिबांसाठी रुग्णालय असावे, यासाठी जागेचे महापालिकेकडे हस्तांतरण केले आहे. टाऊनहॉलसाठी जागा उपलब्ध करून दिली आहे. याशिवाय भूमिगत गटारे, रस्ते या मूलभूत सुविधांची पूर्तता झाली आहे, असा दावा विद्यमान नगरसेवक त्यांच्या पॅनलच्या माध्यमातून करत आहेत. त्यांचा विकासाच्या मुद्द्यावर भर आहे. राष्ट्रवादीचे दत्तात्रय साने, तसेच भाजपाचे पांडुरंग साने या दोन स्थानिकांविरुद्ध शिवसेनेचे नेताजी काशीद लढत देत आहेत. बहुजन समाज पार्टीचे विकास सूर्यवंशी याच ठिकाणी लढत देत आहेत.
दत्ता साने यांच्या पॅनलमधील पुरस्कृत उमेदवार सतीश दिघे या उमेदवाराबरोबर भाजपाचे कुंदन गायकवाड, काँग्रेसचे अभिमन्यू गायकवाड, शिवसेनेचे नितीन रोकडे, आरपीआयचे विशाल साबळे रिंगणात आहेत. त्याचबरोबर अन्य सहा अपक्ष रिंगणात आहेत. तर राष्ट्रवादीच्या स्वाती साने यांच्याबरोबर भाजपाच्या स्वीनल म्हेत्रे, शिवसेनेच्या योगिता रणसुभे, अपक्ष संगीता कोरडे लढत देत आहेत.
महिला सर्वसाधारण गटात राष्ट्रवादीच्या सोनम मोरे यांच्याविरुद्ध भाजपाच्या अलका मोरे, शिवसेनेच्या लतिका सर्जेराव भोसले आणि अपक्ष साधना अंकुश मळेकर या लढत देत आहेत. (प्रतिनिधी)