जिल्हा रुग्णालयाकडे थकबाकी
By admin | Published: March 27, 2017 02:47 AM2017-03-27T02:47:27+5:302017-03-27T02:47:27+5:30
सांगवी येथील जिल्हा रुग्णालयाकडे महापालिकेच्या मालमत्ता कराची सुमारे १ कोटी ४७ लाख रुपयांची रक्कम थकीत
पिंपरी : सांगवी येथील जिल्हा रुग्णालयाकडे महापालिकेच्या मालमत्ता कराची सुमारे १ कोटी ४७ लाख रुपयांची रक्कम थकीत असल्याने पालिकेने रुग्णालयाला नोटीस दिली आहे. शुक्रवारी केलेल्या कारवाईत रुग्णालयाने १३ लाख रुपये जमा केले आहेत. उर्वरित रक्कम शासनाकडून मिळाल्यानंतर त्वरित देणार असल्याचे रुग्णालय प्रशासनाकडून सांगण्यात आले.
मार्च अखेरीमुळे महापालिका करसंकलन विभागाने थकबाकी मिळकतींवर जप्तीची धडक कारवाई सुरू केली आहे. यासाठी अधिका-यांच्या पथकाची नेमणूक करण्यात आली आहे. या पथकाने शुक्रवारी नवी सांगवी येथील जिल्हा रुग्णालयावर कारवाई केली. करसंकलनाच्या या कारवाईने रुग्णालयाकडून थकबाकीपोटी सुमारे १३ लाख रुपयांचा धनादेश पथकामधील अधिका-यांकडे सुपूर्त केला. दरम्यान मालमत्ता करापोटीची अद्याप १ कोटी ४७ लाख रुपये देणे बाकी आहे. थकीत रक्कम देण्याबाबत महापालिकेने जिल्हा रुग्णालयाला नोटीस दिली होती. त्यामध्ये १ कोटी ४७ लाख रुपये थकीत असल्याची नोंद होती.
करसंकलन विभागाने मिळकत कराच्या थकबाकीपोटी एकूण दहा मिळकतींवर जप्तीची कारवाई केली. यामध्ये सांगवीच्या जिल्हा सर्वोपचार रुग्णालयावर जप्तीची कारवाई करण्यात आली. या कारवाईने अनुक्रमे ८ लाख ९५ हजार ९८८ रुपये व ११ लाख ३५ हजार २३० रुपये, आकुर्डी बिगर निवासीकडून १ लाख १३ हजार २६९ रुपये, दोन व्यावसायिक मिळकतींकडून ३ लाख २२ हजार रुपये, चिखलीच्या चार मिळकतींचे ८ लाख २२ हजार आणि सांगवीच्या रुग्णालयाकडून १३ लाख रुपये असे एकूण २४ लाख ४४ हजार रुपयांची थकबाकी करापोटी धनादेशाद्वारे वसुली करण्यात आली. (प्रतिनिधी)
थकीत करासंदर्भात आम्हाला नोटीस प्राप्त झालेली आहे. त्यानुसार १ कोटी ४७ लाख जमा करायचे आहेत. आमच्या विभागात याबाबत सांगितले आहे. सोमवार किंवा मंगळवारपर्यंत रक्कम मिळाल्यास कर जमा केला जाईल.
- डॉ. आर. के. शेळके,
जिल्हा शल्यचिकित्सक