कामाचे पैसे न देणाऱ्या मालकाची दुचाकी जाळली
By ऑनलाइन लोकमत | Published: October 3, 2021 11:43 PM2021-10-03T23:43:32+5:302021-10-04T00:01:52+5:30
पिंपरी - चिंचवडमधील येथील घटना; कामगार पोलिसांच्या ताब्यात
पिंपरी : कामाचे पैसे दिले नाही म्हणून कामगाराने मालकाची दुचाकी पेटविली. याप्रकरणी कामगाराला पोलिसांनी ताब्यात घेतले. पिंपरी -चिंचवड लिंक रोडवर चिंचवड येथे रविवारी (दि. ३) सायंकाळी साडेपाचच्या सुमारास ही घटना घडली.
अंकित शिशुपाल यादव (वय २७, सध्या रा. पिंपळे गुरव, मुळगाव उत्तर प्रदेश), असे पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या कामगाराचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अंकित हा मांजरी येथील गणेश उंदरे पाटील यांच्याकडे कामाला आहे. गणेश यांचा पिंपळे गुरव येथे सिमेंटचे ब्लॉक बनविण्याचा कारखाना आहे. त्या कारखान्यात अंकित कामाला आहे. मालक गणेश यांनी त्यांची दुचाकी वापरण्यासाठी अंकित यादव याला दिली होती. मालक गणेश यांनी कामाचे ४० हजार रुपये दिले नाहीत, या कारणावरून अंकित यादव याला संताप अनावर झाला.
कामाचे पैसे न देणाऱ्या मालकाची दुचाकी जाळली https://t.co/CbvSFUjpi9#Pimpripic.twitter.com/sjI7LSoM7R
— Lokmat (@MiLOKMAT) October 3, 2021
दरम्यान अंकित यादव हा रविवारी सायंकाळी चिंचवड येथे आला. मालकाने कामाचे पैसे दिले नाहीत, त्या रागाच्या भरात त्याने त्याच्याकडील मालकाची दुचाकी भर रस्त्यात जाळली. घटनेची माहिती मिळताच पोलीस व आग्निशामक दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. अग्निशामक दलाच्या जवानांनी आग नियंत्रणात आणली.