भात पेरणीस झाली सुरुवात
By admin | Published: June 2, 2017 02:15 AM2017-06-02T02:15:01+5:302017-06-02T02:15:01+5:30
पवन मावळ परिसरात नदीच्या पाण्यावरील भात पेरणी करण्यास काही शेतकऱ्यांनी सुरुवात केली आहे. पवना धरण परिसरातील
लोकमत न्यूज नेटवर्क
काले : पवन मावळ परिसरात नदीच्या पाण्यावरील भात पेरणी करण्यास काही शेतकऱ्यांनी सुरुवात केली आहे. पवना धरण परिसरातील ज्या ठिकाणी शेतीसाठी सिंचन सुविधा आहे त्या ठिकाणी भाताची पेरणी शेतकरी करत आहे. मॉन्सून केरळमध्ये दाखल झाला असून, लवकरच पश्चिम महाराष्ट्रात दाखल होण्याची शक्यता असल्याने भात पेरणीच्या कामासाठी शेतकरी लगबग करू लागले आहेत.
पवन मावळात काही ठिकाणी धुळवाफेवरील पेरणीची कामे एक अवकाळी पाऊस झाल्यावर करणार असल्याने शेतकरी एका पावसाची वाट पाहात आहेत. मावळ तालुका भातासाठी प्रसिद्ध आहे. येथे प्रामुख्याने इंद्रायणी या वाणाचे उत्पादन घेतले जाते.
अलीकडे फुले समृद्धी हा वाणही भातउत्पादकांना आकर्षित करु लागला आहे. मात्र, आंबेमोहोरसारखा वाण आता मावळातून हद्दपार होतो की काय अशी स्थिती आहे.
तुलनेने कमी उत्पादन मिळत असल्यामुळे या वाणाचे फार थोडे शेतकरी उत्पादन घेत आहेत. शासनाचा कृषी विभागा खरीप हंगामासाठी सज्ज झाला आहे. शेतकऱ्यांना विविध उपक्रम, योजनाद्वारे मार्गदर्शन, मदत केली जात आहे. विशेषत: भातपीकाबाबत अधिक पुढाकार घेतला जात आहे. एसआरटी, चतुसुत्रीपद्धतीने लागवड करण्यासाठी शेतकऱ्यांना प्रवृत्त केले जात आहे. त्या साठी कार्यशाळा, प्रशिक्षण शिबीर घेण्यात आले. भात बियाणांबाबतही मार्गदर्शन करण्यात येत आहे. बीजप्रक्रियापासून पेरणी, लागवडीपर्यंतचे मार्गदर्शन करण्यात येत आहे.
गतवर्षी चांगला पाऊस झाला. हवामानानेही चांगली साथ दिली. त्यामुळे भाताचे उत्पादन चांगले झाले होते. या वर्षीही मान्सूनचे आगमन वेळेवर होणार असल्याचा आणि सरासरीपेक्षा जास्त पाऊस होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.
त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. भातलागवडीस विलंब होऊ नये म्हणून काही शेतकरी त्यामुळेच भातपेरणीची लगबग करीत असल्याचे पवन मावळात दिसत आहे.