नाट्य परिषद निवडणुकीत रंगत, विजयासाठी कलाकार टेक्नोसॅव्ही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 3, 2018 01:43 AM2018-10-03T01:43:06+5:302018-10-03T01:43:22+5:30
नाट्य परिषद निवडणुकीत रंगत : प्रचाराचे विविध फंडे सुरू
पुणे : नाट्य परिषद पुणे शाखेच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या प्रचाराला अवघे चार दिवसच उरलेले असताना उमेदवारांनी अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी प्रचाराची जोरदार तयारी सुरू केली आहे. ही निवडणूक खरेतर पुणे शाखेची; पण, उमेदवारांच्या झंझावाती प्रचारतंत्रामुळे त्याला सार्वत्रिक निवडणुकीचा रंग चढला आहे. आपल्या पॅनेलाच विजयी करा अशा स्वरूपाचे प्रसिद्ध कलाकारांचे व्हिडिओ, पपेटच्या माध्यमातून मतदारांना आवाहन, चौकांमध्ये फ्लेक्स अशा माध्यमातून प्रचाराचे फंडे आजमावले जात असल्याने यंदाची निवडणूक ही लक्षवेधी ठरत आहे. तसेच फेसबुकवरूनही लाइव्ह केले जात आहे.
नाट्य परिषदेच्या पुणे शाखेची निवडणूक जाहीर झाली असून कार्यकारिणीचे १९ सदस्य निवडण्यासाठी रविवारी (७ आॅक्टोबर) मतदान होणार आहे. यासाठी 57 उमेदवार रिंगणात आहेत. विद्यामान शाखाध्यक्ष सुरेश देशमुख, प्रमुख कार्यवाह दीपक रेगे आणि कोशाध्यक्ष मेघराज राजेभोसले यांच्या नेतृत्वाखालील नटराज पॅनेल, माजी अध्यक्ष डॉ. सतीश देसाई आणि नाट्यनिर्मात्या-अभिनेत्री भाग्यश्री देसाई यांच्या नेतृत्वाखालील रंगधर्मी पॅनेल आणि माजी अध्यक्ष प्रदीपकुमार कांबळे यांच्या नेतृत्वाखालील लोकमान्य पॅनेल अशा तीन पॅनेलमध्ये लढत होत आहे.
नाट्य परिषद पुणे शाखेचे दीड हजार आजीव सभासद आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. एक काळ असा होता की मतदारांना दूरध्वनी करण्यापासून ते दारोदारी जाऊन मतदारराजाला मत देण्यासाठी विनंती केली जायची. मात्र, कामाच्या व्यापामध्ये आणि काहीसे वयोमानामुळेही घरोघरी जाणे शक्य नसल्याने पँनेलच्या उमेदवारांनी ‘सोशल मीडिया’ वापर प्रचारासाठी करण्यास सुरूवात केली आहे. अगदी स्वप्निल जोशी सारख्या प्रसिद्ध कलाकार मंडळी ही व्हिडिओ च्या माध्यमातून सोशल मीडियावर पँनेलला मतदान करण्याचे आवाहन करताना दिसत आहे. तर काही उमेदवार पपेटच्या माध्यमातून मतदारांना खेळीमेळीतून मत देण्यास सांगत आहेत.
भालचंद्र पानसे ज्येष्ठ उमेदवार
वयाची ७५ वर्षे पार केलेल्या व्यक्तीस निवडणूक लढवता येणार नाही, अशी घटना दुरुस्ती नाट्य परिषदेने केली आहे. रंगधर्मी पॅनेलचे भालचंद्र पानसे यांचे वय हे 74 वर्षे असल्याने ते निवडणुकीतील सर्वांत ज्येष्ठ उमेदवार ठरले आहेत. याच पॅनेलचे जतीन पांडे हे सर्वाधिक लहान वयाचे उमेदवार होते.
मात्र, त्यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. उमेदवारांच्या वयाचा पुरावा सादर केल्यानंतरच त्यांचे उमेदवारी अर्ज स्वीकारले आहेत. त्याचप्रमाणे केंद्र सरकारने जाहीर केलेल्या प्रमाणपत्रांचे सादरीकरण केल्यावरच मतदारांना मतदान करता येणार आहे, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी शिरीषकुमार जानोरकर यांनी दिली.
’ग्लोबल पुलोत्सवा’च्या तयारीसाठी परदेशामध्ये असलेल्या सतीश देसाई यांच्या अनुपस्थितीत भाग्यश्री देसाई रंगधर्मी पॅनेलच्या प्रचाराची धुरा सांभाळत आहेत. या पॅनेलच्या सर्व उमेदवारांची छायाचित्रे असलेले फ्लेक्स पुण्यातील सर्व रंगमंदिराच्या आवारात तसेच रमणबाग प्रशालेच्या चौकात लावण्यात आले आहेत.
समाज माध्यमांचा वाढलेला प्रभाव ध्यानात घेता रंगधर्मी आणि नटराज पॅनेलने प्रचारासाठी प्रसिद्ध कलाकारांच्या ‘फेसबुक लाइव्ह’चा आधार घेतला आहे. तर, लोकमान्य पॅनेलच्या उमेदवारांनी दूरध्वनी आणि एसएमएस या गोष्टींवर भर दिला आहे.