पाकिस्तानचा फजली आंबा पिंपरी बाजारात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2018 01:26 AM2018-09-21T01:26:29+5:302018-09-21T01:26:56+5:30
लाल बहाद्दूर शास्त्री भाजी मंडईमधील फळ बाजारामध्ये पाकिस्तानचा फजली आंबा दाखल झाला आहे.
पिंपरी : लाल बहाद्दूर शास्त्री भाजी मंडईमधील फळ बाजारामध्ये पाकिस्तानचा फजली आंबा दाखल झाला आहे. मोसमातील सर्वात शेवटचा आंबा म्हणून फजली आंब्याची ओळख आहे. हा आंबा दाखल झाला असून, शौकीन ग्राहकांची त्याला पसंती मिळत आहे.
राज्यामध्ये फजली आंबा आॅगस्टनंतरच दाखल होतो. सप्टेंबरमध्ये या आंब्यांची आवक वाढली असून, ग्राहकांकडूनही त्याला मागणी मिळत आहे. सप्टेंबरच्या अखेरपर्यंत हा आंबा बाजारामध्ये विक्रीसाठी राहण्याची शक्यता असल्याची माहिती फळ विक्रेत्यांनी दिली. आंब्याच्या मोसमामध्ये सर्वांत शेवटी दोन जातीचे आंबे बाजारामध्ये येतात. त्यामध्ये डिंगा व चौसा या जातीच्या आंब्यांचा समावेश असतो. मुंबईतील काही व्यापारी पाकिस्तानमधून फजली आंबा खरेदी करतात. आंबा मुंबईत दाखल झाल्यानंतर त्याच्या मागणीनुसार तो राज्याच्या इतर शहरांमध्ये पाठवण्यात येतो. सद्य:स्थितीत फजली आंब्याचे भाव ३५० ते ५०० रुपये प्रतिकिलो आहेत. फजली आंबा मोसम संपल्यानंतर बाजारामध्ये दाखल होतो. त्यामुळे त्याचे दर जास्त असतात. मात्र आंब्याची गोडी असणारे ग्राहक आंबा महाग असला तरी खरेदी करतात. ज्यांना हा आंबा पावसाळ्यामध्ये दाखल होतो हे माहीत असते ते या आंब्याची आतुरतेने वाट पाहत असतात. दुसऱ्या क्रमाकांच्या प्र्रकारामध्ये त्याचे वजन अंदाजे दीड किलो असते.
>फजली आंबा महाग असला तरी अनेक शौकीन लोक खरेदी करतात. चवीमध्ये हा आंबा खूप मधुर असल्यामुळे मागणीही चांगली आहे. सध्या आवक कमी आहे. जशी ग्राहकांची मागणी असेल तसा आंबा मागवला जातो. पाकिस्तानच्या सिंध प्रांतात त्याचे उत्पादन होते. - कुमार शिरसाठ, फळ विक्रेते.