अधिकमासामुळे लांबणार पालखी सोहळा, जुलैच्या पहिल्या आठवड्यात वारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2018 01:07 AM2018-04-09T01:07:33+5:302018-04-09T01:07:33+5:30
जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांच्या ३३३ व्या पालखी सोहळ्याच्या प्राथमिक तयारीला श्री संत तुकाराममहाराज संस्थानाच्या वतीने सुरुवात झाली.
देहूगाव : जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांच्या ३३३ व्या पालखी सोहळ्याच्या प्राथमिक तयारीला श्री संत तुकाराममहाराज संस्थानाच्या वतीने सुरुवात झाली. हा पालखीसोहळा श्रीक्षेत्र देहूगाव येथून ज्येष्ठ कृष्ण सप्तमी गुरुवार, ५ जुलै रोजी प्रथेप्रमाणे दुपारी दोनच्या सुमारास श्रीक्षेत्र पंढरपूरकडे प्रस्थान होणार आहे. हा पालखी सोहळा देहूतून निघाल्यावर ६ जुलैला पालखी उद्योगनगरीत दाखल होईल, तर पुण्यात ७ जुलैला पोचणार आहे, अशी माहिती श्री संत तुकाराममहाराज संस्थानाच्या विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. पालखी सोहळ्याचा कार्यक्रम फडकरी, दिंडीचालक यांच्या सभेत जाहीर केला आहे.
पालखी सोहळ्याचे ५ जुलैला प्रस्थान व पहिला मुक्काम श्रीक्षेत्र देहूगाव इनामदार वाड्यात होईल. ६ जुलैला आकुर्डी विठ्ठल मंदिर, ७ आणि ८ जुलैला श्री निवडुंगा श्री विठ्ठलमंदिर पुणे, ९ जुलैला लोणी काळभोर येथील विठ्ठल मंदिर, १० जुलै यवत, ११ जुलै वरवंड, १२ जुलै उंडवडी गवळ्याची, १३ जुलै बारामती शारदा विद्यालय, १४ जुलै सणसर, १५ जुलै (बेलवडी येथे गोल रिंगण) निमगाव केतकी, १६ जुलै (इंदापूर येथे गोल रिंगण) इंदापूर, १७ जुलै सराटी, १८ जुलै (माने विद्यालय येथे गोल रिंगण) अकलुज, १९ जुलै (माळीनगर येथे उभे रिंगण) बोरगाव, २० जुलै (तोंडले बोंडले येथे धावा) पिराची कुरोली, २१ जुलै (बाजीराव विहीर येथे उभे रिंगण) वाखरी तळावर मुक्काम करणार असून, पालखी २२ जुलै रोजी दुपारी एकनंतर पंढरपूरकडे प्रस्थान करणार असून, रात्री पंढरपूर शहरात श्री संत तुकाराममहाराज मंदिरात मुक्कामाला पोहोचणार आहे, तर २३ जुलैला नगरप्रदक्षिणा करून पालखी २७ जुलैपर्यंत येथे
मुक्कामी राहील.
>परंपरेनुसार यंदा पालखीचा पुणे येथील नाना पेठेतील श्री निवडुंग्या विठ्ठल मंदिरात दोन दिवस मुक्काम सोडला, तर प्रत्येक ठिकाणी एकच मुक्काम होणार आहे. या पालखी सोहळ्याच्या दरम्यान प्रथेप्रमाणे बेलवडी येथे पहिले गोल रिंगण होणार असून, इंदापूर, सराटी येथील माने विद्यालयाजवळ व माळीनगर येथे उभे रिंगण, तोंडले बोंडले येथे धावा, तर बाजीराव विहिरीजवळ आणि वाखरीवर भाविकांना उभे रिंगण पाहायला मिळेल.