अर्ज बाद करताना आदेशाची पायमल्ली
By admin | Published: February 16, 2017 03:05 AM2017-02-16T03:05:42+5:302017-02-16T03:05:42+5:30
महापालिका निवडणुकीसाठी पिंपळे गुरव प्रभाग क्रमांक २९ (क) जागेसाठी दाखल केलेला उमेदवारीअर्ज चुकीचे कारण सांगून बाद
पिंपरी : महापालिका निवडणुकीसाठी पिंपळे गुरव प्रभाग क्रमांक २९ (क) जागेसाठी दाखल केलेला उमेदवारीअर्ज चुकीचे कारण सांगून बाद करण्यात आला. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांची पायमल्ली करून निवडणूक निर्णय अधिकारी यांनी निवडणूक लढण्याच्या हक्कापासून वंचित ठेवले आहे, असा आरोप करून राजकुमार घन:श्याम परदेशी यांनी याप्रकरणी न्यायालयात धाव घेणार असल्याचे पत्रकार परिषदेत सांगितले. कोणाच्या तरी सांगण्यावरून अधिकाऱ्यांनी हे कृत्य केले आहे, असा आरोप परदेशी यांनी केला आहे.
परदेशी यांचे कायदा सल्लागार कांबिये म्हणाले, की उमेदवारी अर्जासोबतचे जोडण्यात येणारे प्रतिज्ञापत्र नोटरीच्या सही शिक्क्यासह असावे, असा नियम नसताना अथवा हे बंधनकारक नसताना प्रतिज्ञापत्र नोटरी केलेले नाही, हे कारण पुढे करून जाणीवपूर्वक अर्ज स्वीकारण्यास नकार दिला. निवडणूक निर्णय अधिकाऱ्याची ही कृती न्यायालयीन निर्देशाचे उल्लंघन करणारी आहे. प्रतिज्ञापत्रात असलेल्या त्रुटींबाबत निवडणूक निर्णय अधिकाऱ्याने संबंधित उमेदवाराला नोटीस देणे आवश्यक आहे. तसेच त्रुटींची पूर्तता छाननी सुरू होण्यापूर्वी करण्याची मुभा द्यायला हवी होती. (प्रतिनिधी)