पंढरीचा वारकरी सेवा़भावी वृत्तीचा : चैतन्यमहाराज देगलूरकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 5, 2018 03:07 PM2018-07-05T15:07:40+5:302018-07-05T15:08:09+5:30
विठोबा केवळ वारकऱ्यांचा असा अभिनिवेश बाळगणे चुकीचे : चैतन्यमहाराज देगलूरकर
पिंपरी: अनेक मराठी-कानडी लोकांचे कुलदैवत हे विठोबा आहे. पंढरीचा विठोबा हा तसा सर्वांचाच आहे. असे असले तरी त्यावर वारकऱ्यांचा जास्तीत जास्त अधिकार आहे, असे मत प्रसिद्ध कीर्तनकार चैतन्यमहाराज देगलूरकर यांनी व्यक्त केले.
अखिल भारतीय वारकरी महामंडळ आणि पिंपळे सौदागर ग्रामस्थांच्या वतीने महाराष्ट्रातील ज्येष्ठ कीर्तनकार आणि प्रवचनकारांचा सत्कार करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. पंढरपूर देवस्थान समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ औसेकर महाराज, संत एकनाथ महाराजांचे वंशज योगीराज महाराज गोसावी, प्रमोदमहाराज जगताप, चंद्रकांत महाराज वांजळे, पुरूषोत्तम महाराज पाटील यांचा सत्कार करण्यात आला. व्यासपीठावर डॉ. रामकृष्णदास महाराज लहवीतकर, प्रकाश महाराज जवंजाळ, उमेशमहाराज देशमुख, सतीशमहाराज काळजे, संतदास महाराज मनसुख, संयोजक शेखर कुटे, नाट्य परिषद अध्यक्ष भाऊसाहेब भोईर, नगरसेवक नाना काटे, निर्मला कुटे, रंगनाथ फुगे, बाबासाहेब तापकीर, रामभाऊ बराटे आदी उपस्थित होते.
देगलूकर महाराज म्हणाले, समितीवर काम करणे अवघड किंवा अशक्य नाही. त्यासाठी समितीवर काम करण्याची आवड असणाºया व्यक्तीस संधी दिल्यास चांगले काम होईल. विठोबा केवळ वारकऱ्यांचा असा अभिनिवेश बाळगणे चुकीचे आहे. महाराष्ट्रातील असे अनेक लोक आहेत. की त्यांचे कुलदैवत विठोबा आहे. मराठी आणि कानडी असे अनेक लोक आहेत, ते विठोबाला मानतात. त्यामुळे विठोबा हा सर्वांचाच देव आहे. कारण त्याकडे सर्वांचाच ओढा आहे. त्यामुळे पंढरपूर अधिक स्वच्छ चांगले कसे राहिल यासाठी काम करण्याची गरज आहे. पंढरीत काय सेवा असाव्यात नसाव्यात यावर चर्चा होणे गरजेचे आहे. पंढरीचा वारकरी हा सेवाभावी वृत्ती जोपासणारा आहे. त्यामुळे देवस्थान किंवा समितीनेही वारकरी हीत पाहण्याची गरज आहे.
लहवीतकर महाराज म्हणाले, पंढरपूर देवस्थानच्या सहअध्यक्षांनाही राज्यमंत्रिपदाचा दर्जा मिळायला हवा. पंढरपूरच्या मुलभूत प्रश्नांबाबत वारकरी महामंडळाने लढा दिला होता. त्यामुळे विठ्ठलाची काही लोकांच्या जोखडातून मुक्तता झाली होती. पंढरपूर हे वारकऱ्यांचे आहे. तिथे वारकरी नेतृत्वच असावे. पंढरीची वारी वाढते आहे. तिथे सुविधाही मोठ्याप्रमाणावर मिळण्याची गरज आहे. समिती ही वारकऱ्यांची असावी राजकीय नसावी.
औसेकर महाराज म्हणाले, वारीत सहभागी होणाऱ्यांना सुलभ दर्शन व्हावे यासाठी प्रयत्नशील राहणार आहे. दर्शन हे शुल्क आणि विनाशुल्क असावे, यावर सर्व संप्रदायाचा विचार घेऊन निर्णय घेतला जाईल. पंढरपूरच्या विकासासाठी प्रयत्न करणार आहे. आषाढीत ३६ तासांपर्यंत दर्शनाला वेळ लागतो. यावरही विचार सुरू आहे. विठ्ठलाचे दर्शन हा वारकऱ्यांचा हक्क आहे. त्याला सुकर दर्शन व्हायला हवे. तसेच महिन्याची वारी करणाऱ्यांनाही सुलभ दर्शन कसे होईल. यासाठी धोरण तयार करणार आहोत. मंदिराचे स्टक्चरल आॅडीट करण्याचे गरज आहे. नाना शिवले यांनी सूत्रसंचालन केले. शेखर कुटे यांनी आभार मानले.