पाऊले चालती पंढरीची वाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2018 12:50 AM2018-07-08T00:50:55+5:302018-07-08T00:51:22+5:30

कुळी पंढरीचा नेम। मुखी सदा नाम विठोबाचे।। असे म्हणत लाखो वैष्णव भगव्या पताका उंचावत आळंदीहून पंढरीकडे मार्गस्थ झाले. जुन्या गांधी वाड्यातील आजोळघरी ‘श्रीं’च्या पालखी सोहळ्याने आळंदीकरांचा पाहुणचार घेतला.

Pandharpur Wari News | पाऊले चालती पंढरीची वाट

पाऊले चालती पंढरीची वाट

Next

आळंदी - कुळी पंढरीचा नेम। मुखी सदा नाम विठोबाचे।। असे म्हणत लाखो वैष्णव भगव्या पताका उंचावत आळंदीहून पंढरीकडे मार्गस्थ झाले. जुन्या गांधी वाड्यातील आजोळघरी ‘श्रीं’च्या पालखी सोहळ्याने आळंदीकरांचा पाहुणचार घेतला.
दोन दिवसांच्या मुक्कामास संत ज्ञानेश्वरमहाराज पालखी सोहळ्याला पुण्यनगरीत विसावणार आहे. निरोप देण्यासाठी आळंदीकर थोरल्या पादुका मंदिरापर्यंत आले होते. सुमारे ३२ दिवसांचा विरह सहन करावा लागणार असल्याने माऊलींना निरोप देताना अनेकांच्या नेत्रांच्या कडा पान्हावल्या.
आळंदीत गेल्या चार दिवसांपासून लाखो वैष्णवांचा हरिनामाचा गजर चालू होता. शनिवारी (दि. ७) पहाटे दोनच्या सुमारास भाविकांना आजोळघरातील माऊलींच्या पादुकांचे दर्शन बंद ठेवण्यात आले. आजोळघरी परंपरेने गांधी कुटुंबीयांच्यावतीने रुद्राभिषेक आणि पादुकापूजन करण्यात आले. त्यांच्यावतीने महानैवेद्य दाखविण्यात आला. देवस्थानच्यावतीने पहाटपूजा आणि आरती करण्यात आली. यानंतर ऊर्जितसिंह शितोळे सरकार यांच्या वतीने माऊलींना प्रथा परंपरेने नैवेद्य झाला. दरम्यान, आळंदीकर माऊलींची पालखी उचलण्यासाठी पहाटे सज्ज झाले. सहाच्या सुमारास श्रींची पालखी आजोळघरातून आळंदीकर ग्रामस्थांनी व खांदेकरी यांनी खांद्यावर घेत बाहेर आणली.
त्यानंतर माऊली-माऊलीनामाच्या गजरात ‘पुंडलिक वरदे हरी विठ्ठल’च्या नामघोषात पालखी नगरपालिका चौकात आली. या ठिकाणी माजी नगराध्यक्ष नानासाहेब गरुड यांनी पुष्प सजावटीने सजवलेल्या वैभवी चांदीच्या पालखीरथात आळंदीकरांनी पालखी फुलांनी सजविलेल्या चांदीच्या रथात ठेवली. आळंदी पालिकेच्यावतीने देवस्थान समिती, मालक,
चोपदार, दिंडीकरी या मानकऱ्यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी नगराध्यक्षा वैजयंता उमरगेकर, उपनगराध्यक्ष सागर भोसरे,
यात्रा समिती सभापती पारुबाई तापकीर, मुख्याधिकारी समीर भूमकर आदींनी श्रींच्या पालखी रथात श्रींचे दर्शन घेत सोहळ्याचे स्वागत करून श्रींच्या पालखी सोहळ्यास निरोप दिला.
दरम्यान, आळंदीतील प्रदक्षिणा
मार्ग, पालिका चौक, देहू फाटा, चोविसावाडी, वडमुखवाडी या ठिकाणी रस्त्याच्या
दुतर्फा भाविकांनी माऊलींच्या पादुकांच्या दर्शनासाठी, तसेच निरोप देण्यासाठी गर्दी
केली होती.

उद्योगनगरीत वैष्णवांची मनोभावे सेवा
 
पिंपरी : श्री क्षेत्र देहूतून पंढरपूरकडे प्रस्थान ठेवलेल्या संत तुकाराममहाराजांची पालखी आकुर्डीतील विठ्ठल मंदिरातील मुक्कामानंतर शनिवारी पहाटे पाचच्या सुमारास पुण्याच्या दिशेने मार्गस्थ झाली. ‘साधुसंत येती घरा, तोचि दिवाळी दसरा़़़’ या भावनेतून शहरवासीयांनी वारकरी व वैष्णवांची भक्तीभावाने सेवा केली. त्याचबरोबर पालखी सोहळ्यातील वारकºयांना भावपूर्ण निरोप दिला.
आषाढी वारीसाठी संत तुकाराममहाराज पालखीचे गुरुवारी देहूगावातून प्रस्थान झाले. शुक्रवारी सायंकाळी पालखी आकुर्डी (विठ्ठलवाडी) येथील विठ्ठल मंदिरात विसावली. वारकरी, भाविक भक्तांच्या सेवेसाठी विठ्ठलवाडीसह शहरातील नागरिकांनी पालखी मुक्कामस्थळी भेट दिली. येथील विठ्ठलमंदिर परिसरात टाळ, मृदंगाच्या निनादाने वातावरण भारावून गेले. पालखीच्या दर्शनासाठी आकुर्डीत नागरिकांची गर्दी झाली होती. पहाटेसुद्धा नागरिक दर्शनासाठी पालखी मुक्कामस्थळी हजर होते.
कपाळी भगवा टिळा, खांद्यावर भगव्या पताका, मुखात हरिनामाचा गजर करणाºया वारकºयांच्या उपस्थितीत पहाटे ५ वाजता आकुर्डीतून पालखी पुण्याच्या दिशेने मार्गस्थ झाली. आकुर्डी, चिंचवड, पिंपरी या ठिकाणी महामार्गावर दुतर्फा पालखी सोहळा पाहण्यासाठी आणि संत तुकाराममहाराज पालखीचे दर्शन घेण्यासाठी अबाल वृद्धांची गर्दी झाली होती. पुणे-मुंबई महामार्गावरून पुण्याकडे हा पालखी सोहळा मार्गस्थ होणार असल्याने या मार्गावरील वाहतूक तात्पुरत्या स्वरूपात पर्यायी रस्त्याने वळविली होती. चिंचवड, पिंपरी, मोरवाडी येथे सकाळी नागरिक पालखीच्या दर्शनासाठी उभे होते.वारकºयांना फराळ, पाणी, दूधवाटप करण्यासाठी स्वयंसेवी संस्थांचे कार्यकर्त्यांची लगबग दिसून आली.
सकाळी खराळवाडीतील विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात सकाळी ९ वाजता पालखी विश्रांतीसाठी विसावली. त्या वेळी दर्शनासाठी मोठी गर्दी झाली होती. त्या ठिकाणी वारकºयांना फराळवाटप करण्यात आले. फराळ आटोपल्यानंतर साडेनऊच्या सुमारास पालखी मार्गस्थ झाली. दुपारी १२ वाजता पालखीसोहळा दापोडी येथे दुपारच्या विश्रांतीसाठी विसावला. त्या ठिकाणीही वारकºयांनी भोजन केले. विविध सामाजिक संस्था आणि संघटनांच्या वतीने पालखी मार्गावर ठिकठिकाणी वारकºयांसाठी प्रसाद, पाणी, चहावाटप, चप्पल दुरुस्ती, दाढी-कटिंग, आरोग्य तपासणी, वैद्यकीय उपचार अशा विविध प्रकारच्या सेवा पुरविण्यात आल्या.
 

Web Title: Pandharpur Wari News

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.