स्मार्ट सिटीत पॅनसिटी आराखडा , समितीची बैठक २० मिनिटांत गुंडाळली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 11, 2017 02:35 AM2017-11-11T02:35:44+5:302017-11-11T02:35:50+5:30
पिंपरी-चिंचवड सिटी लिमिटेड कंपनीच्या (स्मार्ट सिटी) संचालक समितीची दुसरी बैठक शुक्रवारी सकाळी महापालिका भवनात झाली.
पिंपरी : पिंपरी-चिंचवड सिटी लिमिटेड कंपनीच्या (स्मार्ट सिटी) संचालक समितीची दुसरी बैठक शुक्रवारी सकाळी महापालिका भवनात झाली. केवळ वीस मिनिटांत बैठक उरकण्यात आली. पॅनसिटी आणि एरिया बेस डेव्हलपमेंटचा आराखडा (डीपीआर) करण्यासंदर्भातील सल्लागार विषयास मंजुरी देण्यात आली. स्मार्ट सिटीतील कामांच्या निविदा प्रक्रिया डिसेंबरपर्यंत करण्याविषयी चर्चा झाली.
पिंपरी-चिंचवड महापालिकेचा समावेश स्मार्ट सिटीत झाल्यानंतर पहिली बैठक रद्द झाली होती. त्यानंतर १८ आॅगस्टला पहिली बैठक झाली होती. त्या वेळी समितीसमोर कोणतेही महत्त्वाचे विषय नसल्याने पंचवीस मिनिटांत बैठक उरकण्यात आली होती. त्यात ‘एसपीव्ही’ची स्थापना आणि नवीन मुख्याधिकारी नियुक्त होईपर्यंत आयुक्त श्रावण हर्डीकर यांची नियुक्तीही केली होती.
महापालिका भवनात शुक्रवारी सकाळी ११ वाजताची बैठकीची वेळ होती. अध्यक्ष आणि नगरविकास विभागाचे प्रधान सचिव डॉ. नितीन करीर हे बैठकीपूर्वीच उपस्थित होते. त्यानंतर महापौर नितीन काळजे, आयुक्त श्रावण हर्डीकर, सभागृह नेते एकनाथ पवार, स्थायी समिती सभापती सीमा सावळे, विरोधी पक्षनेते योगेश बहल, विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी, पीएमपीचे अध्यक्ष तुकाराम मुंढे, सदस्य प्रमोद कुटे, नगरसेवक सचिन चिखले, उपमुख्याधिकारी नीळकंठ पोमण आदी उपस्थित होते.
तर केंद्रीय गृहनिर्माण विभागाचे सहसचिव आर. एस. सिंग यांचे विमान हुकल्याने बैठकीला उपस्थित राहू शकले नाहीत. काही सदस्य वेळेवर उपस्थित न राहिल्याने अकराची बैठक साधारण साडेअकराला सुरू झाली. तत्पूर्वी सदस्यांनी डॉ. करीर यांच्याशी संवाद साधला. ही बैठक ११.५० वाजता संपली. वीस मिनिटांच्या बैठकीत अजेंड्यावर अकरा विषय होते. त्यापैकी चार विषय हे तांत्रिक होते, तर तीन विषय कार्यालयीन कामकाजासंदर्भात होते. पॅनसिटी डीपीआर आणि पुणे स्मार्ट सिटीने वाहतूक नियोजनाविषयी पाठविलेल्या विषयावर चर्चा झाली.
पॅनसिटी निविदा महिनाभरात
आयुक्त हर्डीकर म्हणाले, ‘‘आजच्या बैठकीत पॅनसिटी, एरिया बेस डेव्हलपमेंट आणि एरिया बेस डेव्हलपमेंटसाठी प्रपोजल मॅनेजमेंट युनिट तयार करण्याविषयी सूचना देण्यात आल्या. डीपीआरचे काम पूर्ण करण्यासंदर्भात नियोजन केले आहे. सल्लागार संस्थांबरोबरच निविदा पूर्व बैठक झाली आहे. तसेच सल्लागार नियुक्त झाल्यानंतर विषयानुसार पुढील तज्ज्ञ नियुक्तीसंदर्भात महिनाभरात यासंदर्भातील कार्यवाही पूर्ण होईल. त्यानंतर समितीची संमती घेऊन कार्यवाहीचे नियोजन आहे. स्मार्ट वाहतूक नियोजन, पाणी व्यवस्थापन, वायफाय, वाहतूक नियोजन, स्मार्ट पार्किंग करण्याचे नियोजन आहे.’’