पंक्चर दुकानदार टोळीच्या सूत्रधाराचा पोलिसांकडून शोध
By ऑनलाइन लोकमत | Published: December 20, 2018 01:08 AM2018-12-20T01:08:55+5:302018-12-20T01:09:20+5:30
वाहनचालकांची लूट : दापोडी-खडकीतील दुकानांची तपासणी
खडकी : अठरा पंक्चर दाखवून अठराशे रुपये मोटारचालकाकडून उकळणाऱ्या पंक्चरच्या दोन दुकानदारांना मंगळवारी अटक केली. त्यानंतर दुसºया दिवशीही खडकी पोलिसांनी तपासात वेग आणून वाकडेवाडी ते दापोडीपर्यंत सर्व पंक्चर दुकानांची तपासणी करून कर्मचा-यांना माहितीसाठी बुधवारी ताब्यात घेतले. महामार्गावर उभारलेल्या या दुकानदारांच्या टोळयांचा मुख्य सूत्रधाराचा पोलिसांकडून शोध सुरू आहे.
जुना पुणे-मुंबई महामार्गावर वाकडेवाडी ते कासारवाडी या भागात पंक्चर दुकानदारांकडून वाहनचालकांची फसवणूक होत असल्याचा प्रकार सर्वप्रथम ‘लोकमत’ने ८ आॅक्टोबर रोजी उजेडात आणला होता. त्यानंतर एका वाहनचालकांच्या तक्रारीनंतर खडकी पोलिसांनी १८ डिसेंबरला खडकीत टायर पंक्चर काढणाºया दुकानातून दोन आरोपींना अटक केली होती. वाकडेवाडी ते दापोडी येथील टायर पंक्चर काढणाºया दुकानात मोठ्या प्रमाणात परप्रांतीय अल्पवयीन मुले कामाला आहेत. पोलिसांनी केलेल्या तपासणीत ही बाब निदर्शनास आली आहे. वाकडेवाडी, खडकी, बोपोडी, दापोडी या ठिकाणी सर्व नियम धाब्यावर बसवून टायर पंक्चरची दुकाने बिनदिक्कत सुरू आहेत. यामागे खडकी भागातील एक नेत्याच्या कार्यकर्त्याचा हात असल्याची चर्चा आहे. त्यासाठी पोलिसांनी पंक्चर दुकानदारांना ताब्यात घेतले आहे. तपासात संबंधित कार्यकर्त्यांचे नाव पुढे येण्याची शक्यता वर्तविली जात आहे.