पिंपरीत सहाशे सदनिकांच्या पंतप्रधान आवास प्रकल्पाला मंजुरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2018 08:53 PM2018-05-22T20:53:10+5:302018-05-22T20:53:10+5:30
महापालिकेतर्फे आर्थिक दुर्बल घटकांसाठी पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत गृहप्रकल्प राबविण्यात येत आहे.
पिंपरी : पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेतर्फे केंद्र सरकारच्या पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत गृहप्रकल्प राबविण्यात येत असून शहरात १० ठिकाणी एकूण ९ हजार ४५८ सदनिका बांधण्यात येणार आहेत. त्यापैकी च-होली, बो-हाडेवाडी आणि रावेतनंतर आणखी पिंपरी वाघेरे येथील ३७० सदनिकांचा आवास प्रकल्पाच्या आराखड्याला महाराष्ट्र शासनाच्या राज्यस्तरीय मूल्यमापन समितीने मंजुरी दिली आहे, अशी माहिती सत्तारुढ पक्षनेते एकनाथ पवार यांनी दिली आहे.
महापालिकेतर्फे आर्थिक दुर्बल घटकांसाठी पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत गृहप्रकल्प राबविण्यात येत आहे. सार्वजनिक- खासगी भागीदारी (पीपीपी) तत्त्वानुसार इमारती बांधण्याचे नियोजन सुरू आहे. त्यामुळे शहरातील बहुतांश सर्वच नागरिकांना व अर्जदारांना या योजनेत सदनिका उपलब्ध होणार आहे. शहरातील पिंपरी वाघिरे येथील आरक्षण क्रमांक ७७ येथे ३७० घरे व आरक्षण क्रमांक ७९ येथे २३१ घरे बांधणेच्या प्रकल्पाचा डीपीआर म्हाडा कार्यालय मुंबई यांच्याकडे ९ मे २०१८ रोजी पाठविला होता. त्याला महाराष्ट्र शासनाच्या राज्यस्तरीय मूल्यमापन समितीने मंजुरी दिली आहे. त्यामुळे पिंपरी वाघेरे येथील जागेत देखील आवास योजनेअंतर्गंत सदनिकांचे काम सुरू होणार आहे. सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार म्हणाले, शहरात १० ठिकाणी एकूण ९ हजार ४५८ सदनिका बांधण्यात येणार आहेत. त्यापैकी च-होलीत १ हजार ४४२, रावेतमध्ये १ हजार ८०, बो-हाडेवाडीमध्ये १ हजार ४०० आणि आकुर्डीमधील ५०० सदनिकांच्या प्रकल्पांचे प्रकल्प आराखडे मंजूर झाले आहेत. त्यापैकी च-होली व रावेत येथील इमारत उभारण्याचा कामे स्थायी समितीने मंजूर केलेले आहेत. बो-हाडेवाडीची निविदाप्रक्रिया सुरू आहे. इतर प्रकल्पांच्या कार्यवाहीला गती दिली जाणार असून लवकरात लवकर घरे उपलब्ध करून देण्यात येतील.