महापालिका स्वच्छ भारत अभियान अंतर्गत सर्वेक्षण होणार पेपरलेस
By ऑनलाइन लोकमत | Published: January 4, 2019 12:42 PM2019-01-04T12:42:31+5:302019-01-04T12:50:14+5:30
यंदाच्या सर्वेक्षणात चांगले गुण मिळावेत, यासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने कंबर कसली आहे. स्वच्छ अभियानाची पूर्वतयारी केली आहे.
पिंपरी : महानगरपालिका स्वच्छ भारत अभियान अंतर्गत सर्वेक्षण केंद्र शासनामार्फत ४ ते ३१ जानेवारीपर्यंत होणार आहे, यंदाचे सर्वेक्षण हे पेपरलेस होणार आहे.
पिंपरी चिंचवड शहर या स्वच्छ सर्वेक्षणात सहभागी झाले असुन ४ जानेवारी पासुन स्वच्छ सर्वेक्षण करण्यात येत आहे. पहिल्या स्वच्छ सर्वेक्षणात देशात नववा क्रमांक, त्यानंतर दुसऱ्या सर्वेक्षणात सत्तरावा क्रमांक आणि गेल्यावर्षीच्या सर्वेक्षणात ४६ वा क्रमांक मिळाला होता. यंदाच्या सर्वेक्षणात चांगले गुण मिळावेत, यासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने कंबर कसली आहे. स्वच्छ अभियानाची पूर्वतयारी केली आहे. गृहनिर्माण सोसायटी, हॉटेल, रुग्णालय, शाळा महाविदयालयातील विदयार्थी, सेवाभावी संस्था, बचतगट, स्वयंसेवी संस्था, नागरिक, मनपाचे सर्व विभागातील अधिकारी आणि कर्मचारी यांना स्वच्छता मोहिमेत सहभागी करुन घेतले आहे. चिंचवड शहरास या सर्वेक्षणात चांगला गुणानु क्रमांक मिळावा, असा निर्धार महापौर राहूल जाधव आणि आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी केला आहे. मोहिमेमध्ये नागरिकांनी सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.
अतिरिक्त आयुक्त दिलीप गावडे म्हणाले, शहरांचा गुणानुक्रम निश्चित करण्यासाठी संकलित केलेली माहितीचे मुल्यांकनासाठी पाच हजार गुणांची प्रश्नावली आहे. त्याचे विभाजन ४ भागात केलेले आहे. यास प्रत्येकी १२५० याप्रमाणे गुण आहेत. महानगरपालिकेकडुन प्राप्त झालेली ऑनलाईन माहिती, कचरा मुक्त शहरांसाठी प्रमाणपत्रे (स्टार रेटींग) आणि ओपन डेफिकेशन फ्री सिटीज ( ओडीएफ), प्रत्यक्ष निरीक्षणाद्वारे प्राप्त झालेली माहिती आणि नागरिकांच्या प्रतिसादाद्वारे अभिप्रायान्वये प्राप्त झालेली माहितीलाही गुण मिळणार आहे. याबाबतची सर्व तयारी महापालिकेने केली आहे.
....................
स्वच्छ सर्वेक्षणातील ठळक बाबी
स्वच्छ सर्वेक्षण होणार पेपरलेस
शंभर टक्के कचरा निर्मितीच्या ठिकाणी वर्गीकरणावर भर
स्टार रेटिंग प्रोटोकॉलची अंमलबजावणी सुनिश्चित करणे
सार्वजनिक आणि सामुदायिक स्वच्छतागृहांची दुरुस्ती व स्वच्छता
स्वच्छ भारत अँप्सलाही गुण
नागरिकांच्या सहभागाकरीता स्वच्छ भारत मंचाची निर्मिती
नागरिक त्यांच्या वैयक्तिक नवकल्पना समाविष्ठ करू शकतात
घरगुती खत निर्मितीवर भर
उप-विधीमध्ये स्वच्छता सेवा स्तराचा समावेश