चिंचवडमधील ग्लोबल इंटरनॅशनल स्कूलच्या फी वाढीविरोधात पालकांचा घेराव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 9, 2017 03:15 PM2017-12-09T15:15:02+5:302017-12-09T15:17:25+5:30
शाळेच्या फी वाढी विरोधात ज्या पालकांनी निषेध केला. अशा पालकांच्या विद्यार्थ्यांना गुणपत्रिका देण्यास नकार दिल्याने संतप्त पालकांनी शाळा प्रशासणाला घेराव घातला.
चिंचवड : शाळेच्या फी वाढी विरोधात ज्या पालकांनी निषेध केला. अशा पालकांच्या विद्यार्थ्यांना गुणपत्रिका देण्यास नकार दिल्याने संतप्त पालकांनी शाळा प्रशासणाला घेराव घातला. हा प्रकार चिंचवड मधील श्रीधरनगर येथील ग्लोबल इंटरनॅशनल स्कूलमध्ये घडला.
शाळा प्रशासनाने मनमानी पद्धतीने पालकांना उडवाउडावीची उत्तरे दिल्याने संतप्त पालकांनी आज (शनिवार, दि. ०९) शाळा प्रशासनाचा निषेध केला. या बाबत शाळा प्रशासन बोलण्यास तयार नसल्याने पालकांनी पोलिसांकडे धाव घेतली आहे. या शाळेच्या बाबतीत पालकांच्या अनेक तक्रारी आहेत. फी वाढी बाबत निषेध केलेल्या पालकांच्या मुलांचा गृहपाठ बंद केल्याचे पालक सांगत आहेत. आज सकाळी आठ वाजल्यापासून पालक शाळेत आले आहेत. मात्र शाळा प्रशासन आपल्या भूमिकेवर ठाम असल्याने चर्चा करण्यासाठी तयार नाही. शाळेने तयार केलेल्या नियमावलीचे पेपर पालकांना देण्यात आले आहेत. मात्र या पेपरवर शाळेच्या पदाधिकाऱ्यांची सही व शिक्के देण्यात आलेले नाहीत. शाळा प्रशासन हुकूमशाही करत असल्याचा आरोप पालक करत आहेत. या नियमावलीत फी भरण्यास उशीर झाल्यास प्रति दिन २०० रुपये दंड आकारण्याची सक्ती शाळा प्रशासनाने केली आहे. या भूमिकेबाबत पालक संतप्त झाले आहेत.