पिंपरीत आईवडिलांना मुले झाली नकोशी, गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: February 2, 2018 08:36 PM2018-02-02T20:36:37+5:302018-02-02T20:36:41+5:30
केंद्र सरकार बेटी बचाव आणि बेटी पढाव उपक्रम राबवित असतानाच आकुर्डीतील एका पोटची मुले नकोशी झाली आहे. पालकांनी मुलीला पोलिसांच्या ताब्यात दिले असून पोलिसांवर समृद्धी आणि शौर्य या दोघांना सांभाळण्याची जबाबदारी आली आहे. याप्रकरणी राजेश आणि प्रतिभा भोसले यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.
पिंपरी : केंद्र सरकार बेटी बचाव आणि बेटी पढाव उपक्रम राबवित असतानाच आकुर्डीतील एका पोटची मुले नकोशी झाली आहे. पालकांनी मुलीला पोलिसांच्या ताब्यात दिले असून पोलिसांवर समृद्धी आणि शौर्य या दोघांना सांभाळण्याची जबाबदारी आली आहे. याप्रकरणी राजेश आणि प्रतिभा भोसले यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आकुर्डीतील पंचतारानगरातील स्वप्नपूर्ती बिल्डिंग येथे भोसले दाम्पत्य वास्तव्यास आहे. त्यांना दहा वर्षांची मुलगी समृद्धी, अडीच वर्षांचा मुलगा शौर्य अशी दोन अपत्ये आहेत. मागील काही दिवसांपासून दाम्पत्यामध्ये भांडण सुरु होते. त्यामुळे ते दोघेही एकमेकांपासून वेगळे राहत होते. भांडण वाढल्याने मुलांचा सांभाळ कोण करणार? असा प्रश्न निर्माण झाला. या दाम्पत्यांमधील वाद विकोपाला गेल्याने वाद काही दिवसांपूर्वी निगडी पोलीस ठाण्यात पोहोचला. सुरूवातीला दाम्पत्याने मुलाचा सांभाळ करण्यास होकार दिला. पण, मुलीला घरी नेण्यास दोघांनीही नकार दिला. त्यानंतर पोलिसांनी समजूत काढल्यानंतर ते दाम्पत्य बुधवारी दोन्ही मुलांना घेऊन घरी गेले. मात्र, दुस-याच दिवशी गुरूवारी त्यानी दोन्ही मुलांना पुन्हा पोलीस ठाण्यात आणून सोडले. मुलांचा सांभाळ करण्यासाठी पैसे द्यावेत, असे आईचे म्हणने आहेत. परिणामी आई- वडिलांच्या वादात दोन्ही मुलांचे हाल झाले आहेत. सध्या दोन्ही मुलं पोलिसांकडेच असून निगडी पोलीसच त्यांचा सांभाळ करीत आहे. अशोक खंडागळे यांनी गुरूवारी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दोघांवर गुन्हा दाखल केला आहे. आरोपींना न्यायालयासमोर हजर केले आहेत.
भांडणासाठी मुलांना सोडणे चुकीचे
प्रत्येक आई-वडिलांसाठी मुलांचा जन्म हा आनंददायी असते. त्यांच्या संगोपनामध्ये आपले संपूर्ण आयुष्य खर्ची करतात. मन मारून त्यांना सर्व सुख, सोयी आणि सुविधा पुरविल्या जातात. लाडात वाढलेली हीच मुले पुढे होतात, सर्वच नाही पण काही मुले आई-वडिलांचे उपकार विसरतात आणि त्यांच्या म्हातारपणी आधार देण्याऐवजी वृद्धाश्रमाचा रस्ता दाखवतात. अशा अनेक घटना घडल्या आहेत. मात्र, आई-वडिलांनी पोटच्या मुलांना सोडणे ही घटना पिंपरी-चिंचवडमध्ये प्रथमच घडली आहे. भांडणासाठी मुलांना सोडणे चुकीचे आहे, अशी पालकांवर कडक कारवाई करायला हवी, अशी मागणी होत आहे.