शाळेच्या प्रवेश अर्जाचे टोकन मिळविण्यासाठी पालकांच्या रांगा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2019 04:27 PM2019-12-16T16:27:54+5:302019-12-16T16:28:05+5:30

रात्रभर ताटकळतात पालक

Parents in line to get the school admission token | शाळेच्या प्रवेश अर्जाचे टोकन मिळविण्यासाठी पालकांच्या रांगा

शाळेच्या प्रवेश अर्जाचे टोकन मिळविण्यासाठी पालकांच्या रांगा

googlenewsNext
ठळक मुद्देखासगी शाळांच्या व्यवस्थापनाकडून नियोजनाकडे दुर्लक्ष

रावेत : शैक्षणिक वर्ष २०२० -२१ करिता आपल्या पाल्यांच्या शाळा प्रवेशासाठी पालकांची धावपळ सुरू झाली आहे. मात्र यातही ठरावीक शाळांमध्येच प्रवेश मिळावा म्हणून पालकांचा आग्रह असल्याचे दिसून येते. त्यामुळे पाल्यांच्या प्रवेशासाठी जणू पालकांचीच परीक्षा होत असल्याची स्थिती आहे. इंग्रजी माध्यमाच्या शाळांना पसंती दिली जात आहे. रावेत येथील एका इंग्रजी माध्यमाच्या शाळेत आपल्या पाल्याला  प्री-प्रायमरी, नर्सरीच्या वर्गात प्रवेश मिळविण्यासाठी प्रवेश अर्जा करिता पालकांनी शनिवारची रात्र जागून काढली. अर्जांसाठी आवश्यक असणारे टोकन घेण्यासाठी साधारण दोनशेपेक्षा जास्त पालकांनी शनिवारी शाळेसमोरच ठाण मांडल्याचे पाहायला मिळाले. 
पालकांनी चक्क थंडीच्या कडाक्यात शनिवारची रात्र फक्त अर्जाचे टोकन मिळविण्यासाठी जागून काढली. विशेष म्हणजे यामध्ये महिला पालकही मोठ्या संख्येने होते. शहरातील बहुतांश शाळांची प्रवेश प्रक्रिया डिसेंबर महिन्यापासूनच सुरू झाल्या आहेत. रावेत परिसरातील शाळांमध्येही ही प्रवेशप्रक्रिया सुरू झाली आहे. मात्र प्रवेश मर्यादित असल्याने प्रथम येणाºयास प्राधान्य या तत्वाने अर्ज दिले जातात. रविवारी दुपारी तीन वाजता प्रवेश अर्जाचे टोकन मिळणार असल्याने शनिवारी दुपारपासूनच पालक रांगेत होते. संपूर्ण रात्र जागून काढण्याच्या तयारीनेच पालक आले होते. रात्र होऊ लागली तशी ही संख्या वाढू लागली. मध्यरात्री एक वाजता सुमारे २०० पालक शाळेबाहेरच्या रस्त्यावर रांगेत होते. बहुतेकांनी अंथरूण पांघरूण आणले होते. काही जण तर डास प्रतिबंधक अगरबत्ती लावून बसले होते. अनेकांना घरच्या इतर लोकांनी रात्री जेवण आणून दिले होते. आपल्या पाल्याला चांगल्या शाळेत प्रवेश मिळविण्यासाठी प्रत्येक पालकांचा प्रयत्न असतो. सध्या सगळीकडेच इंग्रजी माध्यमांच्या आणि त्यातही कॉन्व्हेंट शाळांचे महत्त्व मोठ्या प्रमाणात वाढत आहे. शाळांमध्ये प्रवेश घेण्यासाठी नगरसेवक, आमदार, खासदारांपासून ते मंत्र्यांपर्यंतचा वशिलाही वेळप्रसंगी लावण्यात येतो.
........

प्रवेश प्रक्रियेबाबत नाराजी व्यक्त
इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये प्रवेश अर्जांची विक्री सुरू झाली आहे. त्यामुळे पालक आपल्या पसंतीच्या शाळांमध्ये पाल्याला प्रवेश मिळविण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न करीत आहेत. अर्जाचे टोकण घेण्यासाठी पालक २४-२४ तास शाळेबाहेर ताटकळत असल्याचे पाहायला मिळत आहे. दुसरीकडे न्यायालयाने पालकांच्या मुलाखती घेण्यास मज्जाव केला असला तरी इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये विद्यार्थी आणि पालकांच्या मुलाखती होणार असल्याची माहिती पालकांनी नाव न छापण्याच्या अटीवर दिली. सध्याच्या प्रवेश प्रक्रियेबाबत अनेक पालकांनी नाराजी व्यक्त केली असून शिक्षण विभागाचे यावर नियत्रंण नसल्याने ही वेळ आल्याची तक्रार पालकांकडून केली जात आहे.
.......
शासकीय आदेश धाब्यावर
नवीन शैक्षणिक वर्षासाठी प्रवेश प्रक्रिया जून महिन्यात सुरू करण्याची सूचना शिक्षण विभागाकडून वारंवार मिळूनही या शाळांनी त्याकडे दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे. शालेय प्रवेश प्रक्रिया, डोनेशन, शालेय फी याबाबत राज्य शासनाकडून नियमावली तयार करण्यात आली आहे. वेळोवेळी परिपत्रके काढली आहेत. काही कायदेही केले आहेत. त्यामध्ये शिक्षा, दंड तसेच शाळेची मान्यता रद्द करण्याचीही तरतूद आहे. तरीही संबंधित शिक्षण संस्थांकडून वर्षानुवर्षे शासकीय आदेश धाब्यावर बसविले जात आहेत.
.....
प्रवेश अर्जाची किंमत भरमसाठ
अनेक शाळेत सुरू झालेल्या नर्सरी आणि प्ले ग्रुप प्रवेश प्रक्रियेत  प्रवेश अर्जांचे दर सगळीकडे वेगवेगळे असल्याचे दिसून येत आहे. बोर्डानुसार शाळांच्या प्रवेश अर्जांचे दर ठरत असून याची किंमत ५०० ते ते २ हजार रुपयांपर्यंत आहेत.
.......
आॅनलाइन अर्ज उपलब्ध व्हावेत
शाळा प्रवेश प्रक्रिया सुलभ होणे आवश्यक आहे. प्रत्येक शैक्षणिक संस्थेने त्यांच्या शाळेची वेबसाईट तयार करून त्यावर प्रवेश अर्ज उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. तसेच हे प्रवेश अर्ज सहज डाउनलोड करता यावेत. असे झाल्यास पालकांना प्रवेश अर्ज मिळविण्यासाठी रात्रभर रांगेत थांबावे लागणार नाही. आॅनलाइन पद्धतीचा काही शाळा व्यवस्थापनाकडून प्रवेश प्रक्रियेसाठी का वापर होत नाही, असा प्रश्न पालकांकडून उपस्थित केला जात आहे. शाळांच्या प्रवेश अर्जासाठी पालकांची होणारी दमछाक टाळण्यात यावी, व सर्व खासगी शाळांनी प्रवेश अर्ज आॅनलाइन उपलब्ध करून देण्यात यावे, त्यासाठी संबंधित प्रशासनाने त्यांना सूचना द्याव्यात, अशी मागणी पालकांकडून होत आहे.
 

Web Title: Parents in line to get the school admission token

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.