"हिंदू संस्कृती जपली पाहिजे, हिंदू राष्ट्र आणखी मोठं होईल"; ऑलिम्पिक चॅम्पियन स्वप्नीलचं वक्तव्य चर्चेत

By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2024 04:22 PM2024-08-28T16:22:14+5:302024-08-28T16:23:18+5:30

आपल्या मनातील भावना व्यक्त करताना ऑलिम्पिक चॅम्पियननं जय श्री राम, हिंदू संस्कृती आणि हिंदू राष्ट्र या शब्दांचा उल्लेख केला.

Paris Olympic Medalist Swapnil Kusale Statement On Hindu Culture And Hindu Nation | "हिंदू संस्कृती जपली पाहिजे, हिंदू राष्ट्र आणखी मोठं होईल"; ऑलिम्पिक चॅम्पियन स्वप्नीलचं वक्तव्य चर्चेत

"हिंदू संस्कृती जपली पाहिजे, हिंदू राष्ट्र आणखी मोठं होईल"; ऑलिम्पिक चॅम्पियन स्वप्नीलचं वक्तव्य चर्चेत

पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेतील कांस्य पदक विजेता नेमबाज स्वप्नील कुसाळे याचे एक वक्तव्य सध्या चांगलेच चर्चेत आहे. पिंपरी-चिंचवड येथील बालेवाडी- हिंजवडीमध्ये आयोजित अमोल बालवडकर यांच्या दहीहंडी कार्यक्रमात तो सेलिब्रिटीच्या रुपात सहभागी झाला होतो. यावेळी आपल्या मनातील भावना व्यक्त करताना त्याने 'जय श्री राम',  हिंदू संस्कृती आणि हिंदू राष्ट्र या शब्दांचा उल्लेख केला. त्याचे हे वक्तव्य आता चर्चेचा विषय ठरत आहे. 

हिंदू संस्कृती अन् हिंदू राष्ट्र यासंदर्भात नेमकं काय म्हणाला स्वप्निल?

 

दही हंडी कार्यक्रमाच्या प्रसंगी  विचारलेल्या प्रश्नावर स्वप्नील कुसाळे म्हणाला की,

 

बालवणकर दादांनी इथं बोलावलं त्याबद्दल सर्वात आधी त्यांचे खूप आभार. हा कार्यक्रम माझ्यासाठी खूप खास आहे. कारण याआधी दही हंडी किंवा यासारखे अन्य हिंदू सणांच्या कार्यक्रमात कधीच सहभागी झालो नाही. सरावातून या गोष्टींसाठी वेळ मिळत नव्हता. यासारख्या सणांच्या माध्यमातून आपण हिंदू संस्कृती जपली पाहिजे. आपण बोलतो की जय श्री राम... या गोष्टी पुढे गेल्या पाहिजे. लहान मुलांना यातून प्रोत्साहन दिले तर हिंदू राष्ट्र आणखी मोठं होईल.

तरुणाईला दिला मोलाचा सल्ला

ऑलिम्पिक चॅम्पियन स्वप्नीलनं यावेळी दही हंडी फोडणाऱ्या मंडळींच्या कौशल्यालाही दाद दिली. उंचावर बांधलेली दही हंडी फोडणं हे एक नवलच आहे. यासाठी तुमची शरीरयष्टी मजबूत असावी लागते. ही मंडळी वर्षभर सराव करतात. ते पाहण्यासाठी उत्सुक आहे, असे तो म्हणाला. यावेळी त्याने फिट अँण्ड हिट राहण्यासाठी बाहेरच काही न खाता पौष्टिक आहारावर भर द्या, असा सल्लाही तरुणांईला दिला आहे.

ऑलिम्पिकचं मैदान गाजवून स्टार झालेल्या स्वप्नीलचं वक्तव्य गाजतंय

ऑलिम्पिक स्पर्धेत रायफलमध्ये पदक जिंकणारा स्वप्नील कुसाळे हा पहिला नेमबाज आहे. एवढेच नाही तर कुस्तीपटू खाशाबा जाधव यांच्यानंतर ७२ वर्षांनी महाराष्ट्राच्या खेळाडूनं ऑलिम्पिकच मैदान गाजवलं आहे. या ऐतिहासिक कामगिरीनंतर तो तरुणांचा नवा हिरो झाला आहे. त्याची लोकप्रियता वाढली असून तो पहिल्यांदा सेलिब्रिटीच्या रुपात कार्यक्रमात सहभागी झाला आहे. यात त्याने जे वक्तव्य केलंय त्यावर सोशल मीडियावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटताना दिसते.  

Web Title: Paris Olympic Medalist Swapnil Kusale Statement On Hindu Culture And Hindu Nation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.