आरोग्य केंद्र झाले वाहनतळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 2, 2018 02:27 AM2018-11-02T02:27:37+5:302018-11-02T02:28:05+5:30
रुग्ण आणि नातेवाइकांची कुचंबणा, प्रशासनाचे दुर्लक्ष
कामशेत : कान्हे येथील ग्रामीण रुग्णालयाचे प्रांगण नागरिकांसाठी पार्किंगचे केंद्र बनले आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून येथे मोठ्या प्रमाणात गाड्या पार्क केल्या जातात़ याकडे रुग्णालय प्रशासनाकडून दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे रुग्णाला अथवा रुग्णवाहिका रुग्णालयात येण्यास अडथळा निर्माण होत आहे.
कान्हे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात रोज सकाळपासून ते रात्री उशिरापर्यंत वाहनचालक आपली वाहने पार्क करून जातात़ त्यामुळे रुग्णालयाला वाहनतळाचे स्वरूप प्राप्त झाले आहे. यामुळे रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांना व नातेवाइकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. स्थानिक काही तरुणांनी येथील फोटो काढून आपली गाडी दिवसभर सुरक्षित व विनामूल्य पार्क करायची असेल तर ग्रामीण रुग्णालयाशी संपर्क साधा, असा उपहासात्मक संदेश सोशल मीडियावर टाकला आहे. त्यामुळे ग्रामीण रुग्णालय नक्की कोणासाठी आहे, असा प्रश्न सर्वांना पडला आहे.
कामशेत येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचीही अशीच अवस्था आहे. काही नागरिक बिनदिक्कत येथे दिवसभर आपली चारचाकी व दुचाकी वाहने पार्क करतात. ही वाहने नक्की कोणाची याची रुग्णालय प्रशासनाकडे चौकशी केली असता याबाबत आम्हाला काही माहिती नाही, असे त्यांनी सांगितले. नोकरदार वर्ग, स्थानिक नागरिक, व्यावसायिक व इतर अनेकजण आपले वाहन सुरक्षित व उन्हापासून बचावासाठी कान्हे येथील सरकारी रुग्णालयाच्या आवारात पार्क करतात. सकाळी सकाळी रुग्णालय सुरू होण्याआधी पार्क केलेले वाहन रात्री उशिरापर्यंत येथेच असते. त्यामुळे कर्मचाºयांना व रुग्णांना आपली स्वत:ची वाहने गेटच्या बाहेर लावावी लागतात.
कान्हे व कामशेत या दोन्ही ठिकाणी सरकारी दवाखान्यांना लोखंडी गेट आहे. मात्र हे गेट कायम उघडेच असते. सुरक्षारक्षक नसल्याने बाहेरच्या वाहनचालकांचे चांगलेच फ ावले आहे़ गेट वरती सुरक्षारक्षक असेल तर या समस्येपासून रुग्णालयातील कर्मचारी व रुग्णांची सुटका होईल़ सुरक्षारक्षकाची नेमण्याची मागणी होत आहे.