नोकरी देण्याचा बनाव करुन पार्लर चालकाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार
By ऑनलाइन लोकमत | Published: May 15, 2018 10:48 AM2018-05-15T10:48:03+5:302018-05-15T11:18:51+5:30
पार्लरमध्ये नोकरी देण्याचे नाटक करून फेशिअलचे ट्रायल घेण्याच्या बहाण्याने मालकानं 16 वर्षीय मुलीवर अत्याचार केल्याची धक्कदायक घटना समोर आली आहे.
पिंपरी-चिंचवड (वाकड) : पार्लरमध्ये नोकरी देण्याचे नाटक करून फेशिअलचे ट्रायल घेण्याच्या बहाण्याने मालकानं 16 वर्षीय मुलीवर अत्याचार केल्याची धक्कदायक घटना समोर आली आहे. एवढंच नाही तर त्यानं मोबाइलवर चित्रिकरण करून कामाला ये नाहीतर व्हिडीओ सर्वांना दाखवेन, अशी धमकी देऊन तिला ब्लॅकमेलदेखील केले. अल्पवयीन मुलीला वारंवार धमकावणाऱ्या नराधमाला वाकड पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
सराफत बरकतअल्ली खान (वय २४ वर्ष) असे पार्लर चालकाचे नाव असून त्याच्याविरोधात बाल लैंगिक अत्याचार पॉस्को अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोमवारी (१४ मे) रात्री त्याला वाकडमधून अटक करण्यात आली. मिळालेल्या माहितीनुसार, आरोपीचे वाकड पार्लर आहे. कामासाठी दोन मुली पाहिजेत, असे त्याने शेजारच्या काही दुकानदारांना सांगितले होते. माहिती मिळाल्यानंतर पीडित मुलगी तेथे कामाला गेली मात्र आरोपीने तुझे ट्रायल घ्यावे लागेल, असे म्हणत तिला पार्लरवरील कंपार्टमेंटमध्ये नेऊन फेशिअल करायला लावले. यावेळी त्याने एका ठिकाणी मोबाइल लपवून ठेऊन रेकॉर्डिंग सुरू केले. फेशिअल करत असताना आरोपीने पीडितेला मिठी मारून लगट करीत बळजबरी केली अन् घडला प्रकार कोणाला सांगितल्यास सर्वांना रेकॉर्डिंग दाखवेन, अशी धमकी दिली.
यानंतर दुसऱ्या दिवशी पीडित मुलगी कामावर न आल्याने आरोपी पुन्हा तिला कामावर येण्यासाठी धमकी दिली. तिच्यासोबत झालेला प्रकार आणि त्याचे वारंवार येणारे फोन यामुळे पीडित मुलगी मानसिक तणावात गेली. तिने घरी याबाबत काहीही सांगितले नाही. या सर्व प्रकाराला कंटाळून तिनं दोन दिवसांपूर्वी घर सोडलं व आता ती बेपत्ता झाली. याबाबत तिच्या वडिलांनी तक्रारदेखील दिली. नातेवाईकांच्या मदतीनं पीडित मुलीचा शोध घेण्यात आला. यानंतर पीडित मुलीच्या आई-वडील बहिणीने घडला प्रकार पोलिसांपुढे कथन केला. यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश माने, सुनिल पिंजन यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक मोहन जाधव यांनी सोमवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल केला आहे. वाकड पोलीस याप्रकरणी तपास करीत आहेत.