Parth pawar : आम्ही भ्रष्टाचाराच्या मुळापर्यंत जाणार, पार्थ पवारांचा भाजपाला इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: October 13, 2021 07:15 PM2021-10-13T19:15:45+5:302021-10-13T19:16:52+5:30
पिंपरी चिंचवडमधील इंद्रायणी नदी प्रकल्पाच्या कामात भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप पार्थ पवार यांनी केला आहे. 'सर्वांच्याच अस्मितेचा विषय आणि मातेसमान नदीतून पैसे खाण्याचा उद्योग पिंपरी चिंचवड भाजपने चलविल्याची तक्रार प्राप्त झाली आहे.
मुंबई - आयकर विभागाने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आप्तेंष्टांवर धाडी टाकल्यानंतर पवार कुटुंबीयांनी भाजपवर हल्लाबोल केला आहे. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केंद्र सरकारला लक्ष्य केले. आता, अजित पवार यांचे सुपुत्र आणि युवक नेते पार्थ पवार यांनीही ट्विटरवरुन भाजपला इशारा दिला आहे. पिंपरी चिंचवडमधील कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत भाजपवर हल्लाबोल केला.
पिंपरी चिंचवडमधील इंद्रायणी नदी प्रकल्पाच्या कामात भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप पार्थ पवार यांनी केला आहे. 'सर्वांच्याच अस्मितेचा विषय आणि मातेसमान नदीतून पैसे खाण्याचा उद्योग पिंपरी चिंचवड भाजपने चलविल्याची तक्रार प्राप्त झाली आहे. पवना व इंद्रायणी नदी सुधार प्रकल्पातील भ्रष्टाचाराच्या आम्ही मुळापर्यंत जाणार, हीच का स्मार्ट सिटी? असा सवाल पार्थ पवार यांनी विचारला आहे. पार्थ पवार सध्या पिंपरी चिंचवड येथील कामांवरुन भाजपवर हल्लाबोल करत आहेत. दरम्यान, काही दिवसांपूर्वी अजित पवारांच्या बहिण म्हणजे पार्थ यांच्या आत्यांच्या कार्यालयावर आयकर विभागाने छापे टाकले होते. त्यामुळे, पवार कुटुंबातील सर्वच सदस्यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.
सर्वांच्याच अस्मितेचा विषय आणि मातेसमान नदीतून पैसे खाण्याचा उद्योग पिंपरी चिंचवड भाजपने चलविल्याची तक्रार प्राप्त झाली आहे. पवना व इंद्रायणी नदी सुधार प्रकल्पातील भ्रष्टाचाराच्या आम्ही मुळापर्यंत जाणार #हीच_का_स्मार्ट_सिटी
— Parth Pawar (@parthajitpawar) October 13, 2021
काय म्हणाले होते शरद पवार
उत्तर प्रदेशच्या घटनेला जालियनवाला बाग म्हटल्याने आमच्या घरावर छापे टाकण्यात येत आहेत. या केंद्राच्या दबावाला जरा सुध्दा भीक घालणार नाही, त्यांना काय करायचे आहे ते करू द्या असा गर्भित इशारा राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी दिला. तसेच, या छाप्यांवरून शरद पवारांनी सोलापुरात तुफान बॅटिंग केली होती. अजित पवारांच्या घरी पाहुणे येऊन गेले. पण पाहुण्यांची चिंता आपल्याला अजिबात वाटत नाही, असाही टोला पवारांनी लगावला होता.