विदर्भातून चिंचवड येथे आलेली महिला प्रवासी बॅग विसरली अन् यंत्रणेची चांगलीच पळापळ झाली
By ऑनलाइन लोकमत | Published: January 30, 2021 06:17 PM2021-01-30T18:17:48+5:302021-01-30T18:18:51+5:30
दिल्ली येथे इस्त्रायल दुतावासाच्या परिसरात बाॅम्बस्फोटाची घटना घडल्यानंतर देशात तसेच राज्यात हायअलर्ट जारी करण्यात आला आहे.
पिंपरी : विदर्भातून एका बसने आलेली महिला प्रवासी चिंचवड येथे पोलीस उपायुक्त कार्यालय परिसरात महामार्गावर उतरली. घरी जाण्यासाठी रिक्षात बसल्या. मात्र त्यांची बॅग त्या तेथेच विसरल्या आणि मोठा गोंधळ उडाला. एका व्यावसायिकाला ती बॅग बेवारस असल्याचे दिसून आले. त्याने पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर पळापळ सुरू झाली. बाॅम्ब शोधक नाशक पथकाला पाचारण करण्यात आले. मात्र बॅगेत कपडे तसेच इतर साहित्य मिळून आल्याने सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला.
दिल्ली येथे इस्त्रायल दुतावासाच्या परिसरात बाॅम्बस्फोटाची घटना घडल्यानंतर देशात तसेच राज्यात हायअलर्ट जारी करण्यात आला आहे. बेवारस वस्तू, बॅग, संशयित व्यक्ती याबाबत पोलिसांना माहिती देण्यात आवाहन करण्यात आले आहे. त्यामुळे नागरिकही सतर्क झाले आहेत.
पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयांतर्गत दोन परिमंडळ असून पोलीस उपायुक्तांकडे त्याची जबाबदारी आहे. चिंचवड येथे सेंट मदर तेरेसा उड्डाणपुलाजवळ पुणे-मुंबई महामार्गालगत एकाच इमारतीत दोन्ही परिमंडळांचे कार्यालय आहे. या इमारतीच्या परिसरात महामार्गावर बेवारस बॅग असल्याचे शनिवारी (दि. ३०) सकाळी नऊच्या सुमारास एका व्यावसायिकाच्या निदर्शनास आले. त्याने याबाबत पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी पुणे येथील बाॅम्ब शोधक नाशक पथकाला याबाबत कळविले. पथक तत्काळ दाखल झाले. त्यांनी बॅगची तपासणी केली असता त्यात कपडे तसेच इतर साहीत्य असल्याचे समोर आले. संशयास्पद काही नसल्याने सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला.
दरम्यान, सदरची बॅग विसरल्याचे महिलेच्या लक्षात आले. त्यामुळे तिच्या कुटुंबियांनी बॅगचा शोध सुरू केला. चिंचवड येथे महामार्गावर कुटुंबिय आले. त्यावेळी गर्दी दिसून आली. नेमका काय प्रकार आहे, म्हणून पाहिले असता, बॅगची तपासणी होत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. ती बॅग आपलीच असल्याचे त्यांच्या लक्षात आले. बॅगची ओळख पटविली. बॅग आमचीच असल्याचे त्यांनी पोलिसांनाही सांगितले.