PCMC: पठ्ठ्या सात वर्षे कामावरच आला नाही, अखेर पालिकेने दिला नारळ
By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2023 01:43 PM2023-05-11T13:43:28+5:302023-05-11T13:44:03+5:30
सात वर्षे गैरहजर राहूनही पालिकेने विविध संधी देत कर्मचाऱ्याला पाठीशी घालण्याचा प्रयत्न केला असल्याचे समोर
पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या ‘ह’ क्षेत्रीय कार्यालयात काम करणारा शिपाई तब्बल सात वर्षे कामावर आला नाही. वारंवार नोटीस देऊनही त्याने महापालिकेला केराची टोपली दाखवली. अखेर जाग आलेल्या पालिका प्रशासनाने या कर्मचाऱ्याला कामावरून काढून टाकले आहे.
‘ह’ क्षेत्रीय कार्यालयामध्ये सुनील पाटील हा कर्मचारी शिपाई म्हणून काम करत होता. तो मे २०१६ मध्ये कामावर आला होता. त्यानंतर महापालिकेमध्ये पाटील कामावर आला नाही, तसेच त्याबाबत त्याने प्रशासनाला कळवलेदेखील नाही. तरीही त्याला पाठीशी घालत महापालिका प्रशासनाने त्याला सेवेत राहण्याच्या अनेक संधी दिल्या. त्याची वेतनवाढ दोनवेळेस तात्पुरत्या स्वरूपात रोखली होती, तसेच त्याला वारंवार नोटीसही दिली होती. वर्तमानपत्रातदेखील त्याबाबत नोटीस दिली होती. मात्र, पालिकेच्या कोणत्याही आदेशाला त्याने उत्तर दिले नाही.
दरम्यान, पाटील हा त्याच्या राहत्या पत्त्यावर आढळला नाही. त्यामुळे पालिकेने त्याच्याशी केलेला पत्रव्यवहार परत आला. पालिका प्रशासनाने त्याच्या नातेवाइकांशीदेखील संपर्क करण्याचा प्रयत्न केला. मात्र, ते उपलब्ध झाले नाहीत. त्यामुळे सुनील पाटील यांस कामावरून काढून का टाकू नये अशी नोटीस वर्तमानपत्रात प्रसिद्ध करण्यात आली. मात्र, त्यालाही पाटील याने कोणताही प्रतिसाद दिला नाही. अखेर आयुक्त शेखर सिंह यांनी त्याला सेवेतून काढण्याचा निर्णय घेतला. त्याबाबतचा आदेश बुधवारी जारी करण्यात आला. मात्र, सात वर्षे गैरहजर राहूनही पालिकेने विविध संधी देत कर्मचाऱ्याला पाठीशी घालण्याचा प्रयत्न केला असल्याचे समोर आले आहे.