गस्तीवरील अधिकाऱ्यांना द्यावे लागणार ‘लोकेशन’; पोलिस नियंत्रण कक्ष दर दोन तासांनी घेणार ‘अपडेट’
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2024 11:54 IST2024-12-20T11:52:32+5:302024-12-20T11:54:23+5:30
गस्त घातली की नाही हे कळण्यासाठी शहरात काही ठिकाणी दवाखाना, मंदिर, बसस्थानक येथे हजेरी वही ठेवलेली असायची.

गस्तीवरील अधिकाऱ्यांना द्यावे लागणार ‘लोकेशन’; पोलिस नियंत्रण कक्ष दर दोन तासांनी घेणार ‘अपडेट’
पिंपरी : बीट मार्शल दिलेल्या मार्गावर गस्त घालतात की नाही, यावर नजर ठेवण्यासाठी ठिकठिकाणी क्यूआर कोड लावण्यात आले आहेत. मात्र, रात्र गस्तीवरील अधिकाऱ्यांना अशा प्रकारे क्यूआर कोडबाबत सक्ती नाही. त्यामुळे काही अधिकारी याचा गैरफायदा घेतात. आता रात्रगस्तीवर अधिकाऱ्यांवर लक्ष ठेवण्यासाठी दर दोन तासांनी पोलिस नियंत्रण कक्षाकडून त्यांचे लोकेशन घेण्यात येणार आहे.
‘जागते रहो’ असे म्हणत पूर्वी पोलिसांना रस्त्यावर काठी आपटत गस्त घालायला लागायची. गस्त घातली की नाही हे कळण्यासाठी शहरात काही ठिकाणी दवाखाना, मंदिर, बसस्थानक येथे हजेरी वही ठेवलेली असायची. गस्तीवरच्या पोलिसाने गस्तीच्या वेळीच सही करायची पद्धत होती. यात अनेक त्रुटी असल्याने काही पोलिस यातूनच पळवाट काढायचे. आता या पळवाटेला संधी मिळणार नाही, अशी नवी क्यूआर कोड पद्धत पोलिसांकडून अवलंबली जात आहे. विशेषतः पिंपरी - चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत त्याची प्रभावी अंमलबजावणी होत आहे. त्यामुळे पोलिसांना ठरलेल्या मार्गावर रात्री गस्त घालावीच लागणार आहे. कारण त्याच्या नोंदी क्षणात नियंत्रण कक्षाला कळत आहेत.
पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालय हद्दीत पोलिस उपायुक्तांचे तीन परिमंडळ आहेत. प्रत्येक परिमंडळाकरिता एक पोलिस निरीक्षक असतो. तसेच प्रत्येक पोलिस ठाण्याच्या रात्रपाळीचे उपनिरीक्षक, सहायक निरीक्षक नेमणुकीस असतात. त्यांना गस्तीची हद्द ठरवून दिलेली असते. मात्र, काही अधिकारी रात्री एकाच ठिकाणी थांबायचे. आम्ही अमूक ठिकाणी आहे, तमूक ठिकाणी आहे, असे वायरलेसवरून कळवायचे. आता मात्र पोलिसांच्या बीट मार्शलला (दुचाकीवरील पोलिस) क्यूआर कोडमुळे चुकारपणा करता येणे अशक्य आहे.
रात्री चारवेळा द्यावी लागणार माहिती
रात्रगस्तीवरील काही पोलिस अधिकारी चुकारपणा करतात. एखादा मोठा गुन्हा घडला तरच ते त्या ठिकाणी हजर होतात. यावर पोलिस आयुक्तांनी उपाय शोधला आहे. रात्रगस्तीवरील अधिकाऱ्यांना रात्री अकरा, एक, तीन आणि पहाटे पावणेपाच वाजता आपले लोकेशन पोलिस नियंत्रण कक्षाला द्यावे लागणार आहे. त्यामुळे रात्री अधिकाऱ्यांना गस्त घालावी लागणार आहे.
...तर करावा लागणार खुलासा
रात्री कॉलला उत्तर न देणाऱ्या, तसेच लोकेशन न पाठविणाऱ्या पोलिस अधिकाऱ्यांकडून खुलासा मागविण्यात येणार आहे. खुलासा समाधानकारक नसल्यास त्याचा कसुरी अहवालही पोलिस आयुक्तांना पाठविण्यात येणार आहे.