पवना धरणातून विसर्ग वाढविला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2018 12:53 AM2018-08-18T00:53:00+5:302018-08-18T00:53:14+5:30
मावळ परिसरात पावसाचा जोर वाढला आहे. पिंपरी-चिंचवड शहरासाठी पवना धरणातून पाणीपुरवठा होता. धरण शंभर टक्के भरल्याने नदीत पाण्याचा विसर्ग केला जात आहे.
पिंपरी : मावळ परिसरात पावसाचा जोर वाढला आहे. पिंपरी-चिंचवड शहरासाठी पवना धरणातून पाणीपुरवठा होता. धरण शंभर टक्के भरल्याने नदीत पाण्याचा विसर्ग केला जात आहे. शुक्रवारी सकाळपासून २९०८ ऐवजी विसर्ग वाढवून ३००६ क्यूसेक या वेगाने नदीपात्रात पाणी सोडण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे पवना नदी वाहू लागली आहे.
पिंपरी-चिंचवड शहराला पवना धरणातून पाणीपुरवठा केला जात आहे. धरण शंभर टक्के भरल्याने पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला आहे. यावर्षी पावसाचे प्रमाण अधिक आहे. आॅगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात धरण फुल झाले. मावळ परिसरातील गावांचाही पाण्याचा प्रश्न संपला आहे. एक जूनपासून २५४३ मिमी पाऊस धरण परिसरात झाला आहे. गतवर्षी याच दिवशी २४६२ मिमी पाऊस झाला होता. पाऊस सुरूच राहिला तर पवना नदीतील पाण्याची पातळी वाढू शकते. यामुळे नदीकाठच्या नागरिकांना सावधानतेचा इशारा दिला आहे.
महापालिकेचा आपत्ती निवारण कक्ष सज्ज आहे. महापालिका प्रशासनाने पवना नदी काठच्या रावेत, पुनावळे, चिंचवड, थेरगाव, पिंपरी, पिंपळे सौदागर, सांगवी, दापोडी परिसरातील नागरिकांना सर्तकतेचा इशारा दिला आहे. धरण परिसरात आजही पावसाची संततधार सुरू आहे. आठ दिवसांपासून धरण परिसरात पावसाची संततधार सुरू आहे.