पिंपरी-चिंचवडसाठी वरदायिनी असणारे पवना धरण ९८ टक्के भरले; नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2020 11:17 AM2020-08-30T11:17:34+5:302020-08-30T11:19:22+5:30
गेल्या काही दिवसांत मावळ तालुक्यात मुसळधार पाऊस
पवनानगर : धरणपाणीलोट क्षेत्रात असलेल्या मुसळधार पावसामुळे मावळ तालुक्यासह पिंपरी-चिंचवड शहराच्या पाण्याचे मुख्य स्त्रोत असलेले पवना धरण ९८ टक्के भरले आहे. त्यामुळे पिंपरी चिंचवड शहरा वासियांवरचे पाणी कपातीचे घोंघावणारे संकट आता दूर झाले आहे.
मावळ तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून जोरदार पाऊस कोसळतो आहे. त्यामुळे परिसरातील धरणांच्या पाणी पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे पिंपरी शहराला एकप्रकारे मोठा दिलासा मिळाला असून काही प्रमाणात पवना नदीत विसर्ग देखील करण्यास सुरुवात झाली आहे. पाटबंधारे विभाग व जिल्हा प्रशासनाने नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.
धरण परिसरात दिवसभरात ८२ मिमी पावसाची नोंद झाली असुन १ जुनपासुन १५४३मिमी पावसाची नोंद झाली आहे. तर सकाळी १० वाजल्यापासुन पवना धरणाचे अर्धा फुटाने सहा दरवाजे उघडून २२०० क्युसेकने विसर्ग करण्यात आला आहे व धरण प्रशासनाच्या वतीने पवना नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.तसेच धरण क्षेत्रात पावसाचा जोर वाढल्यास नदीपात्रात विसर्ग वाढविण्यात येईल असे पाटबंधारे विभागाचे उपभियंता अशोक शेटे यांनी सांगितले आहे.