पिंपरी - चिंचवडकरांसाठी खुशखबर! मावळातील पवना धरण १०० टक्के भरलं, ३४५० क्यूसेकन विसर्ग सुरु...
By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2021 07:55 PM2021-09-12T19:55:27+5:302021-09-12T19:56:00+5:30
नदीकाठच्या गावांना दक्षतेचा इशारा दिला
पिंपरी : मावळात पावसाची संततधार सुरू असल्याने पवना धरणातून ३४५० क्यूसेक पाणी सोडण्यात आले आहे. नदीकाठच्या गावांना दक्षतेचा इशारा दिला आहे.
पिंपरी-चिंचवड शहराला पाणीपुरवठा करणारे पवना धरण मागील आठवड्यात शंभर टक्के भरले आहे. यंदा पस्तीस दिवसात धरण भरले होते. गेल्या दोन दिवसांपासून धरण क्षेत्रात पावसाचा जोर सुरू आहे. त्यामुळे धरण शंभर टक्के भरले आहे. त्यामुळे १३५० क्यूसेक वीज निर्मितीसाठी पाणी सोडले आहे. तसेच पावसाचा जोर कायम असल्याने रविवारी आठनंतर सांडव्याद्वारे २१०० क्यूसेक पाणी असा एकूण संचाद्वारे ३४५० क्यूसेक पाणी सोडण्यात आले आहे.
पावसाची संततधार सुरू
शहर परिसरात आज सकाळपासून पावसाची संततधार सुरू आहे. त्यामुळे नागरिकांची तारांबळ उडाली होती. सुट्टीचा दिवस असल्याने खरेदीसाठी बाजारपेठेत आलेल्या नागरिकांची पावसामुळे तारांबळ उडाली होती. भाजी मंडईतही चिखल झाल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागला.
दक्षतेचा इशारा
पिंपरी-चिंचवड शहरातून पवना, मुळा आणि इंद्रायणी नद्या वाहतात. महापालिकेच्या वतीने नदीकाठच्या नागरिकांना दक्षतेचा इशारा दिला आहे. पवना नदीतीरावरील चिंचवड, काळेवाडी, पिंपरी, पिंपळेसौदागर, पिंपळेगुरव, दापोडी भागातील नदीकाठच्या नागरिकांना दक्षतेचा इशारा दिला आहे.