पवना नदीपात्रात दिवसाढवळ्या मातीचा भराव, बिल्डर टाकताहेत राडारोडा; महापालिकेचे दुर्लक्ष
By ऑनलाइन लोकमत | Published: January 10, 2024 10:43 AM2024-01-10T10:43:52+5:302024-01-10T10:45:02+5:30
पिंपळे गुरव येथील मोरया पार्क परिसरामध्ये सातत्याने हे प्रकार सुरू आहेत...
- प्रकाश गायकर
पिंपरी :पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने करण्यात येणारे नदी सुधार प्रकल्पाचे काम रखडले आहे. त्यातच पवना नदीच्या पात्रामध्ये मातीचा भराव टाकून पात्र अरुंद करण्याचा प्रकार समोर आला आहे. पिंपळे गुरव येथे मोरया पार्कमध्ये पवना नदीपात्रामध्ये दिवसाढवळ्या मातीचा भराव टाकला जात आहे; मात्र याकडे महापालिका प्रशासनाने दुर्लक्ष आहे.
शहरातून सुमारे २५ किलोमीटर वाहणारी पवना नदी किवळे, रावेत, थेरगाव, वाल्हेकरवाडी, चिंचवड, रहाटणी, काळेवाडी, पिंपरी, पिंपळे सौदागर, कासारवाडी, पिंपळे गुरव, सांगवी व दापोडी या भागांतून जाते. शहरात वाढणारे नागरीकरण, औद्योगिक क्षेत्रामुळे पवना नदीच्या प्रदूषणात वाढ होत चालली आहे. सातत्याने नदीपात्रात मिसळले जाणारे मैलामिश्रित सांडपाणी आणि औद्योगिक रसायनांच्या पाण्यामुळे नदीची गटारगंगा झाली आहे. असे असताना आता पात्रात भराव टाकून पात्र अरुंद करण्याचे काम सुरू आहे.
पिंपळे गुरव येथील मोरया पार्क परिसरामध्ये सातत्याने हे प्रकार सुरू आहेत. बांधकामाचा राडारोडा व मातीची ट्रॅक्टर व डंपरमधून वाहतूक केली जाते. तो राडारोडा नदीपात्रात; तसेच तीरावर टाकला जातो. त्यामुळे दिवसेंदिवस नदीचे पात्र अरुंद होत आहे; मात्र महापालिका व महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी, पर्यावरण विभाग, राज्य सरकार यांच्या बोटचेप्या भूमिकेमुळे नदीची शुद्धता हरवत चालली आहे.
पूरस्थिती ओढवल्यास काय?
नदीपात्रात भराव टाकल्याने पावसाळ्यात अरुंद पात्रातून पाणी बाहेर येऊन महापूर येतो. पवना धरणक्षेत्रात २०१३ मध्ये १४८ मिलिमीटरपेक्षा जास्त पाऊस पडला होता. त्यावेळी शहरात अनेक ठिकाणी घरांत पाणी शिरले होते. २०१९ मध्ये आलेल्या पुरामध्येही पिंपळे गुरव व सांगवीमधील अनेक घरांमध्ये पाणी शिरले होते.
नदी सुधार प्रकल्पाला ‘ब्रेक’
शहरातील पवना, मुळा व इंद्रायणी या नद्यांचे पुनरुज्जीवन करण्यासाठी कर्जरोख्यांद्वारे निधी उभा करण्याची घोषणा केली आहे. त्याला राज्य सरकारने मंजुरी दिलेली आहे. मुळा नदीवरील वाकड पूल ते सांगवी या ८.८० किलोमीटर लांबीच्या पहिल्या टप्प्याची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली आहे; मात्र अद्याप कामाचे आदेश दिले नाहीत. त्यामुळे नदी सुधार प्रकल्प कागदावर आहे.
कठोर कारवाई कधी?
नदी तीरावर अनेक व्यावसायिक व बिल्डरांनी पूररेषेत अतिक्रमण केले आहे. पात्रात राडारोडा टाकून नदीपात्र बुजविले आहे. यावर कडक कारवाई करण्याची आवश्यकता आहे; मात्र महापालिका प्रशासनाकडून त्यांना पाठीशी घातले जात आहे. त्यामुळे दिवसेंदिवस नदीपात्र अरुंद होत आहे.
नदीपात्रामध्ये भराव टाकणाऱ्यांवर तातडीने कारवाई करून गुन्हे दाखल करण्यात येतील. कारवाई करण्यासाठी पर्यावरण विभागाने पथकांची नियुक्ती केली आहे. पथकांमध्ये सुरक्षा रक्षक तसेच महापालिकेच्या कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. नदीपात्रात भराव टाकत असल्याचे आढळून आल्यावर जागा मालक, गाडी मालक, चालक यांच्यावर गुन्हे दाखल करणार.
- संजय कुलकर्णी, सहशहर अभियंता, पर्यावरण विभाग.