थेरगावात पवना नदीपात्र पुन्हा फेसाळले; स्थानिक नागरिकांकडून संताप व्यक्त
By ऑनलाइन लोकमत | Published: February 25, 2024 01:10 PM2024-02-25T13:10:22+5:302024-02-25T13:10:31+5:30
पाणी प्रदूषित झाल्याने परिसरात मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरते, डासांचे प्रमाण देखील वाढते
हिंजवडी : थेरगाव मधील केजुदेवी धरण परिसरात पवना नदीपात्र पुन्हा फेसाळले. वारंवार नदी प्रदूषित होऊनही यावर, ठोस उपाययोजना होताना दिसत नसल्याने स्थानिक नागरिक प्रचंड संताप व्यक्त करत आहेत. पाणी प्रदूषित झाल्याने परिसरात मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरते, डासांचे प्रमाण देखील वाढत असल्याने नागरिकांच्या आरोग्याच्या गंभीर प्रश्न निर्माण होत आहे.
दरम्यान, रविवारी (दि.२५) सकाळी मॉर्निंग वॉक साठी धरण परिसरात गेलेल्या नागरिकांना ही बाब लक्षात आली. निसर्गरम्य केजूदेवी धरण परिसर आणी गर्द झाडीतून खळखळ वाहणारी पवनामाई वारंवार प्रदूषित होत असल्याने पालिका प्रशासन नक्की करतयं तरी काय? असा प्रश्न काही सुज्ञ नागरिक उपस्थित करत आहेत. केजुदेवी धरण परिसरात पवना नदीला वारंवार पडत असलेला जलपर्णीचा विळखा. मिसळत असलेले रसायन मिश्रित सांडपाणी, पर्यायी नदीची होणारी गटारगंगा यामुळे नदीचे अस्तित्वच धोक्यात आले आहे. पवना नदीचे पावित्र्य जपण्यात पालिका प्रशासन सपशेल अपयशी ठरत असल्याने, अधिकारी नक्की काय करतात असा प्रश्न उपस्थित होत आहे.