वेंगसरकर अॅकॅडमीसाठी ‘पॅव्हेलियन’, प्रकल्प सल्लागार नियुक्त करणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2017 01:40 AM2017-12-26T01:40:07+5:302017-12-26T01:40:27+5:30
पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेची स्थायी समितीची सभा मंगळवारी होणार असून, एकूण ७९ विषय विषयपत्रिकेवर असून त्यात थेरगाव येथील दिलीप वेंगसरकर अॅकॅडमीच्या पॅव्हेलियनचे काम करण्यात येणार आहे.
पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेची स्थायी समितीची सभा मंगळवारी होणार असून, एकूण ७९ विषय विषयपत्रिकेवर असून त्यात थेरगाव येथील दिलीप वेंगसरकर अॅकॅडमीच्या पॅव्हेलियनचे काम करण्यात येणार आहे. त्यासाठी प्रसिद्ध वास्तुविशारद शशांक फडके यांची प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार म्हणून नेमणूक करण्यात येणार आहे. कोट्यवधींचे विषय समितीसमोर येणार आहेत.
स्थायी समितीची सभा मंगळवारी होणार आहे. काही दिवसांपूर्वी राष्टÑवादीसह विरोधी पक्षांनी सत्ताधारी भाजपावर विकासकामे होत नसल्याचा आरोप केला होता. विकासकामांना खोडा घातल्याचा आरोप केला होता. मात्र, मागील दोन आठवड्यापासून विकासकामांचे विषय समितीसमोर येऊ लागले आहेत. समाविष्ट गावांच्या आरक्षणांचा विकास, रस्ते तयार करण्याचे विषय मंजूर झाल्यानंतर उद्याच्या बैठकीसमोर कोणते विषय आहेत, याबाबत उत्सुकता आहे. त्यात स्थापत्य, पाणीपुरवठा, आरोग्य, जलनिस्सारण असे विविध विभागांचे विषय समितीसमोर असणार आहेत. तसेच पेव्हिंग ब्लॉक, शाळा बांधणे, रस्ते डांबरीकरण असे विषय मंजुरीसाठी ठेवण्यात आले आहेत. तसेच महापालिका भवनाचेही सुशोभिकरणाचा प्रस्ताव समितीसमोर ठेवला आहे. थेरगाव येथे पिंपरी पालिकेची दिलीप वेंगसरकर अॅकॅडमी आहे. पेव्हेलियनचे काम करण्यात येणार आहे. त्यासाठी सल्लागाराची नेमणूक करण्यात येणार आहे. त्यासाठी फडके यांची वास्तुविशारद व प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार म्हणून नेमणूक करण्यात येणार आहे. त्यांना निविदापूर्वक कामासाठी लघुत्तम निविदा दराच्या सव्वा टक्का व निविदा पश्चात कामासाठी लघुत्तम निविदा दराच्या पाऊन टक्के अशाप्रकारे एकूण दोन टक्के तसेच अंतर्गत सजावटीच्या कामासाठी निविदापूर्व कामासाठी लघुत्तम निविदा दराच्या पाऊण टक्के व निविदा पश्चात कामासाठी लघुत्तम निविदा दराच्या अर्धा टक्के अशाप्रकार सव्वा टक्के व निविदा पश्चात प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार म्हणून पावणेदोन टक्के रक्कम देण्यात येणार आहे.
स्थापत्यविषयक कामांवर भर
अहवालांचे अवलोकन करणे, व्यायामशाळा भाडेतत्त्वाने देणे, दीडशे ट्रॅफिक वॉर्डन नेमणे, महापालिकेच्या मिळकतींच्या सुरक्षेसाठी सुरक्षारक्षकांची निवड करणे, तसेच रखवालदारांचे मदतनीस नेमणे, ४१ स्मशानभूमींमध्ये काळजीवाहक नियुक्त करणे, नाला दुरुस्ती, संत तुकारामनगरातील यशवंतराव चव्हाण रुग्णालयातील लिकेज काढणे, वॉटरप्रूफिंग करणे, लांडेवाडी भोसरीतील रस्त्यावर जॉगिंग ट्रॅक उभारणे, पेव्हिंग ब्लॉक बसविण्यात येणार आहे.
शिवतेज नगरात डांबरीकरण करणे, चिखलीत सीमाभिंत बांधणे, मोरे वस्तीतील रस्ते दुरुस्ती, जलनिस्सारण वाहिन्या टाकणे, चिखलीत मैला शुद्धीकरण केंद्र पंप हाऊस देखभाल दुरस्ती, मोशातील रस्ते, स्मशानभूमी बांधणे, वैदुवस्ती जवळकरनगर येथे खेळाच्या पट्यांचे डांबरीकरण करणे आदी विषय समितीसमोर येणार आहेत. तसेच कासारवाडीत नवीन शाळा बांधण्यात येणार आहे. त्यासाठीच्या तेरा कोटींचा विषय समितीसमोर चर्चेला येणार आहे.
पिंपरी महापालिका
इमारतीचे सुशोभीकरण
पिंपरीतील महापालिका भवनाचे सुशोभिकरण करण्यात येणार आहे. स्थापत्य विभागाकडून हा विषय समितीसमोर ठेण्यात आला आहे. सत्तर लाखांची निविदा होती. त्यापैकी सव्वासोळा टक्के दराने कमी अशी ५८ लाखांची निविदा करारनामा करून घेण्यास मान्यतेसाठी समितीसमोर ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे महापालिका भवनाचे सुशोभिकरण करण्यात येणार आहे. तसेच मुख्य इमारतीच्या गच्चीवर ५२ लाख रुपये खर्चून सोलर पॅनेल बसविणार आहेत.