पवना धरण ५० टक्के भरले : पाणीप्रश्न सुटला!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2018 02:15 AM2018-07-14T02:15:00+5:302018-07-14T02:15:34+5:30
दोन आठवड्यांपासून उद्योगनगरीसह मावळ परिसरात संततधार सुरू आहे. त्यामुळे पिंपरी-चिंचवड शहराची जीवनदायिनी असणारे मावळ तालुक्यातील पवना धरण पन्नास टक्के भरले
पिंपरी : दोन आठवड्यांपासून उद्योगनगरीसह मावळ परिसरात संततधार सुरू आहे. त्यामुळे पिंपरी-चिंचवड शहराची जीवनदायिनी असणारे मावळ तालुक्यातील पवना धरण पन्नास टक्के भरले असून, वर्षभर पुरेल इतका पाणीसाठा झाला आहे. त्यामुळे उद्योगनगरीचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला आहे.
मावळात मॉन्सूनचे जोरदार आगमन झाले. त्यानंतर पंधरा दिवस पावसाने दडी मारली होती. मात्र दहा दिवसांपासून संततधार सुरू आहे. गेल्या चोवीस तासात पवना धरण परिसरात दीडशे मि़मी़ तर लोणावळा शहरात ऐंशी मि़मी़ पावसाची नोंद झाली आहे. पावसाच्या संततधारेमुळे मावळ आणि मुळशी परिसरातील इंद्रायणी, पवना व मुळा या नद्या दुथडी भरून वाहत आहेत. गेल्या आठवड्यात सांगिसे पूल पाण्याखाली जाण्याची घटना व जलपर्णीमुळे इंद्रायणीला वाकसई भागात पूर आल्याच्या घटना घडल्या होत्या. पावसाचा जोर असाच कायम राहिल्यास पुढील काही दिवसांत मावळातील धरणे तुडुंब होण्याची शक्यता आहे. पावसासोबत वारा असल्याने शहरात तसेच मावळात अनेक ठिकाणी विजेचा लपंडाव सुरू आहे. रावेत, किवळे भागातही पावसामुळे विजेचा लपंडाव सुरू आहे.
लोणावळ्यात सरासरी ओलांडली
जून महिना संपला तरी सुरू न झालेला मॉन्सून जुलै महिन्यात लोणावळ्यात चांगलाच सक्रिय झाला आहे. अवघ्या पंधरा दिवसांत पावसाने मागील वर्षीची सरासरी गाठली आहे. लोणावळा शहरात आज अखेर १८१० मि़मी़ पावसाची नोंद झाली आहे. मागील वर्षी आज अखेर हा आकडा १७६५ मि़मी़ होता.