पवार, ओवैसी, पठाण यांच्यावर गुन्हे दाखल करावेत : विहिंपच्या मिलिंद परांडेंची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: February 21, 2020 09:40 PM2020-02-21T21:40:46+5:302020-02-21T21:44:17+5:30
शरद पवार, ओवैसी, वारिस पठाण यांच्यावर गुन्हे दाखल करावेत, अशी टीका विश्व हिंदू परिषदेचे केंद्रीय महामंत्री मिलिंद परांडे यांनी शुक्रवारी पिंपरीतील पत्रकार परिषदेत केली आहे.
पिंपरी : मशिदीसाठीच्या न्यास निर्माणाचा विषय शरद पवार यांनी अनावश्यकपणे समोर आणला आहे. यावरून त्यांच्या जबाबदार व्यक्तिमत्त्वातील बेजबाबदारपणा दिसून येतो. यामुळे नवीन विवादाचे मुद्दे निर्माण करून समाजातील तेढ जाणीवपूर्वक वाढवली जात आहे. सीएएला मुस्लिम तसेच हिंदू अल्पसंख्याक विरोध करतील असा डाव आखला जात आहे. शरद पवार, ओवैसी , वारिस पठाण यांच्यावर गुन्हे दाखल करावेत, अशी टीका विश्व हिंदू परिषदेचे केंद्रीय महामंत्री मिलिंद परांडे यांनी शुक्रवारी पिंपरीतील पत्रकार परिषदेत केली आहे.
सीएए, एनआरसी या विषयांवर विश्व हिंदू परिषदेची भूमिका मांडण्यात आली. या वेळी पश्चिम प्रांत अध्यक्ष पांडुरंग राऊत, प्रदेश कोषाध्यक्ष महेंद्र देवी, पश्चिम महाराष्ट्र प्रांत मंत्री विजय देशपांडे, विभाग मंत्री नितीन वाटकर आदी या वेळी उपस्थित होते. ‘‘सध्या सीएए व एनआरसी विरोधात देशात आंदोलन चालू आहेत, त्यामागे देशद्रोही विचारांची यंत्रणा काम करत आहे. याला आळा बसवायचा असेल तर शाहीनबाग व इतर देशविरोधी आंदोलनाला पाठिंबा देणाऱ्या पक्षांवर व पक्षश्रेष्ठींवर गुन्हे दाखल करावेत, अशीही मागणी परांडे यांनी केली आहे.
परांडे म्हणाले, ‘‘सीएएच्या विरोधामध्ये जे हिंसक आंदोलने देशभर सुरू आहेत, त्यापाठीमागे काही अल्पसंख्याक तुष्टीकरण करणाऱ्या राजनीतिक दल, साम्यवादी दल व शक्ती, हिंसक मुस्लिम संघटन आणि मुस्लिम समाजाच्या एका मोठ्या गटाचा हात स्पष्टपणे दिसतो आहे. जे तथाकथित अहिंसक आंदोलनात ज्याप्रकारे देशविरोधी, हिंदूविरोधी घोषणा व भाषणे सुरू आहेत त्यात देशविरोधी शक्तीसुद्धा त्यांच्या पाठीशी आहेत. अशा सर्व प्रकारच्या हिंसक व देशविरोधी आंदोलनांची विश्व हिंदू परिषद निंदा करते. कायदा हातात घेणाऱ्या व तोडणाऱ्यांवर कायदेशीर कार्यवाही करावी. काल-परवाच्या सभेत वारिस पठाणने जे बेमालूम वक्तव्य केलं, त्यातून या समाजाची विखारी भावना दिसून येत आहे. अशा नेतृत्वाला मुस्लिम समाजाने थारा देऊ नये, नाही तर हिंदू समाज गप्प बसणार नाही.’’