PCMC | "पे अँड पार्क" योजना बारगळली! परवडत नसल्याचे कारण देत ठेकेदारांची माघार
By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2022 11:22 AM2022-09-26T11:22:18+5:302022-09-26T13:22:02+5:30
महापालिका आणि ठेकेदाराचा ५० - ५० फॉर्म्युला...
पिंपरी : महापालिकेने शहरात २० ठिकाणी ''पे अँड पार्क'' योजना सुरू केली. मात्र, परवडत नसल्याचे कारण देत या कामाच्या ठेकेदाराने माघार घेतली आहे. त्यामुळे ही योजना गुंडाळण्यात येणार असल्याचे दिसून येत आहे.
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या तिजोरीमध्ये भर पडावी, यासाठी वेगवेगळ्या योजना लागू करण्यात येत आहेत. त्यातील एक भाग म्हणजे शहरात ''पे अँड पार्क'' योजना लागू करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला. शहरातील ३९६ ठिकाणी ''पे अँड पार्क'' करण्याची तयारी महापालिकेने केली. सुरुवातीच्या पहिल्या टप्प्यात ८० ठिकाणी ''पे अँड पार्क'' करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला.
'पे अँड पार्क'साठी आवश्यक असलेले पट्टे रस्त्यावर मारण्यात आले. काही ठिकाणी लोखंडी बॅरिकेट्स उभारले. ''पे अँड पार्क'' असल्याची वाहनचालकांना माहिती व्हावी, यासाठी ठिकठिकाणी फलकही उभारले. याबाबत निविदाही मागविल्या. आलेल्या ठेकेदारांपैकी निर्मला ऑटो केअर या संस्थेला ''पे अँड पार्क''चे काम दिले. मात्र, गेल्या सहा महिन्यांतील उत्पन्न आणि कर्मचारी वर्गावर होणारा खर्च पाहता ''पे अँड पार्क''चे काम आपल्याला परवडत नाही. आपण यातून माघार घेत असल्याचे कंपनीने महापालिकेला कळविले आहे.
''पे अँड पार्क''ला चालना मिळावी आणि बेशिस्त वाहनचालकांना शिस्त लागावी यासाठी महापालिका आणि वाहतूक पोलीस यांच्या संयुक्त विद्यमाने पोलिसांना कारवाईसाठी टोईंग व्हॅनही दिल्या.
महापालिका आणि ठेकेदाराचा ५० - ५० फॉर्म्युला
महापालिकेने ''पे अँड पार्क''चे सहा पॅकेज केले. यापैकी एक पॅकेज हे बीआरटी रस्त्यावर बिल्डरांकडून महापालिकेस दिलेल्या पार्किंगच्या जागेवर ''पे अँड पार्क''साठी जागा देण्यात आली आहे. उर्वरित पाच पॅकेजमध्ये पुणे-मुंबई रस्त्यावरील नाशिकफाटा ते निगडी, चापेकर चौक, टेल्को रोड, स्पाइन रोड, औंध - रावेत बीआरटी मार्ग, केएसबी चौक - हिंजवडी (बिर्ला हॉस्पिटल जवळील मार्ग, ऑटो क्लस्टर - काळेवाडी फाटा) या २० मार्गावर ''पे अँड पार्क'' सुरू केले. ''पे अँड पार्क''च्या मिळालेल्या पैशातून ५० टक्के महापालिका आणि उर्वरित ५० टक्के ठेकेदाराला देण्याचे ठरले. त्यानुसार अंमलबजावणीही सुरू झाली.