हप्ता दे, नाहीतर धंदा करू देणार नाही; त्रासाला कंटाळून महिलेने प्राशन केले विष
By नारायण बडगुजर | Published: August 12, 2024 04:53 PM2024-08-12T16:53:08+5:302024-08-12T16:54:07+5:30
आम्हा दोघींना हप्त्याचे दरमहा ७०० रुपये द्यावे लागतील, पैसे दिले नाही तर तुला धंदा करून देणार नाही
पिंपरी : ‘‘याठिकाणी मासे विक्री करायची असेल तर आम्हाला दरमहा हप्ता द्यावा लागेल. नाही तर धंदा करू देणार नाही’’, असे म्हणत महिलेला धमकी दिली. महिलेने हप्ता देण्यास नकार दिल्याने तिच्यावर कोयत्याने हल्ला करण्याचा प्रयत्न केला. दोन महिलांच्या त्रासाला कंटाळून मासे विक्रेत्या महिलेने विषारी औषध पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. भोसरी येथील बीआरटी बस थांब्यासमोर पालिकेच्या जागेमधील मच्छी मार्केटमध्ये ८ ऑगस्ट रोजी ही घटना घडली.
याप्रकरणी चक्रपाणी वसाहत, भोसरी येथे राहणा २९ वर्षीय महिलेने रविवारी (दि. ११) भोसरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी घरकुल, चिखली आणि भोसरी येथे राहणार्या दोन महिलांच्या विरोधात खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला. बीएनएस कायदा कलम १०९ (१), ३०८, ११५ (१), ३५१, ३५२, ३ (५), शस्त्र अधिनियम कलम ४ (२५) मुंबई पोलिस अधिनियम कलम ३७ (१), (३), १३५ अन्वये पोलिसांनी गुन्हा नोंद केला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला यांचा मासे विक्रीचा व्यवसाय आहे. दोन महिला फिर्यादी यांच्या दुकानावर आल्या. या ठिकाणी मासे विक्री करायची असेल तर यापूर्वी माझा भाऊ कुक्या याला हप्ते देत होते. तो आता तुरूंगात असल्याने आम्हा दोघींना हप्त्याचे दरमहा ७०० रुपये द्यावे लागतील. पैसे दिले नाही तर तुला धंदा करून देणार नाही, असे म्हणत फिर्यादी यांच्यासह इतर महिलांकडून दरमहा पैशाची मागणी केली. त्या दोन्ही महिला गेल्या १५-२० दिवसांपासून फिर्यादी महिलेला त्रास देत होत्या. दोन्ही महिला फिर्यादी यांच्या दुकानावर आल्या. गेल्या दोन महिन्यांपासून तू हप्त्याचे पैसे दिले नाहीस. तुला जास्त माज आला आहे काय? असे म्हणत त्या दोघांनी शिवीगाळ केली. तुला आता जिवंत सोडत नाही, असे म्हणत त्यांनी कोयता फिर्यादीच्या मानेवर मारला. मात्र फिर्यादी महिलेने तो वार चुकविला. महिलांच्या तीन महिन्यांपासूनच्या त्रासाला कंटाळून फिर्यादी महिलेने गुरुवारी (दि. ८) दुपारी चार वाजताच्या सुमारास विषारी औषध पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. सध्या फिर्यादी महिला वायसीएम रुग्णालयात दाखल आहे.