PCMC: कर थकबाकीदारांच्या जप्त मालमत्तांचा लिलाव सुरू; १८४ मालमत्ता सील, नळजोडही खंडित
By प्रकाश गायकर | Published: March 9, 2024 04:46 PM2024-03-09T16:46:23+5:302024-03-09T16:47:05+5:30
मालमत्ताधारकांनी त्वरित थकीत कर भरून जप्तीची कारवाई टाळावी, असे आवाहन कर संकलन विभागाने केले आहे...
पिंपरी :पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या कर संकलन व कर आकारणी विभागातर्फे जप्त केलेल्या मालमत्तांची लिलाव प्रक्रिया सुरू झाली आहे. लिलावासाठी काढलेल्या मालमत्तांची यादी वर्तमानपत्रात प्रसिद्ध केली आहे. सील केलेल्या सर्व मालमत्तांचा लिलाव करण्यात येणार आहे. त्यामुळे मालमत्ताधारकांनी त्वरित थकीत कर भरून जप्तीची कारवाई टाळावी, असे आवाहन कर संकलन विभागाने केले आहे; तसेच कर संकलन विभागाने गतवर्षीच्या उत्पन्नाचा टप्पा आताच ओलांडला आहे.
करसंकलन
गतवर्षी - ८१४ कोटी रुपये
यंदा (२०२३-२४) - ८१८ कोटी रुपये (आतापर्यंत)
पिंपरी-चिंचवड शहरात ६ लाख १५ हजार नोंदणीकृत मालमत्ता आहेत. सर्वेक्षणात नोंदणी नसलेल्या मालमत्ताही मोठ्या संख्येने आढळून येत आहेत. येत्या २२ दिवसांत कर संकलन विभागाला १८३ कोटी रुपये वसूल करायचे आहेत. त्यासाठी प्रशासनाने कडक भूमिका घेत जप्त मालमत्तांचा लिलाव सुरू केला आहे.
दृष्टिक्षेपात
जप्तीचे अधिपत्र चिकटवलेल्या मालमत्ता - १ हजार ४९१
प्रत्यक्ष सील केलेल्या मालमत्ता - १८४
नळजोड खंडित केलेल्या मालमत्ता - ५८४
६८ कोटींचा भरणा
कराची थकबाकी असलेल्या ३२ हजार १४० जणांना जप्तीसंदर्भात अधिपत्रे काढण्यात आली आहे. सात हजार ३११ अधिपत्रांची अंमलबजावणी करण्यात आली आहे. यापैकी ५ हजार ५२ जणांनी ६८ कोटी ९४ लाख रुपयांचा भरणा केला आहे.
एक लाख जणांचा कर थकीत
कर संकलन विभागाच्या वतीने यंदा मालमत्ता जप्ती, सील आणि नळजोडणी खंडित करण्याचा धडाका लावला आहे. असे असले तरी शहरात एक लाखापेक्षा अधिक मालमत्ताधारकांकडे तब्बल ६८२ कोटी रुपयांचा कर थकीत आहे. या थकबाकीदारांकडून करवसुलीसाठी विभागाने आता लिलावासारखी कठोर कारवाई सुरू केली आहे.
नावे प्रसिद्ध होताच कर भरणा वाढला
शहरात १ लाख ४,३२६ मालमत्ताधारकांचा थकीत कर वसुलीसाठी कर संकलन विभागाने ५० हजार रुपयांहून अधिक थकबाकी असलेल्या थकबाकीदारांची नावे वर्तमानपत्रात प्रसिद्ध करण्यास सुरुवात केली आहे. वर्तमानपत्रात नावे प्रसिद्ध होताच थकबाकीदारांचे धाबे दणाणले असून, ते कर भरण्यास प्राधान्य देत असल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे.
थकीत ६८२ कोटी मालमत्ता करापैकी निवासी मालमत्तांकडे ५०० कोटींपेक्षा अधिक कर थकीत आहे. त्यामुळे वसुलीच्या या अंतिम टप्प्यात निवासी मालमत्तांची जप्ती मोठ्या प्रमाणावर करण्यात येत आहे. पैसे भरण्याची क्षमता असूनही जे मालमत्ताधारक कर भरत नाहीत, अशांवर लक्ष केंद्रित केले आहे. आर्थिक अडचणीत असलेल्या मालमत्ताधारकांना टप्प्याटप्प्याने कर भरण्याची मुभा दिली जात आहे.
- नीलेश देशमुख, सहायक आयुक्त