PCMC | सरकार जाण्याच्या चर्चा अन् महापालिकेत खासदार- आमदारांच्या बैठका
By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2023 12:03 PM2023-04-25T12:03:50+5:302023-04-25T12:17:58+5:30
एकाच दिवशी सत्ताधारी पक्षातील खासदार आणि आमदारांनी पिंपरी- चिंचवड महापालिकेत येत आयुक्तांशी बंद दाराआड चर्चा...
पिंपरी : राज्यामधील सत्तासंघर्षाचा लवकरच निकाल लागून सरकार बदलाची चर्चा सर्वत्र सुरू आहे. असे असताना सोमवारी (दि. २४) एकाच दिवशी सत्ताधारी पक्षातील खासदार आणि आमदारांनी पिंपरी- चिंचवड महापालिकेत येत आयुक्तांशी बंद दाराआड चर्चा केली. दीड तासाहून अधिक वेळ दोघांनीही स्वतंत्र बैठका घेतल्या. महापालिकेतील प्रलंबित कामे मार्गी लावण्यासाठी या बैठका होत्या. मात्र, यामागे राज्यात झालेली राजकीय अस्थिरता कारणीभूत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळामध्ये सुरू झाली आहे.
राज्यामध्ये सत्तासंघर्षावरून सत्ताधारी विरोधकांमध्ये आरोप- प्रत्यारोप सुरू आहेत. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार भाजपसोबत जाऊन सत्ता स्थापन करणार असल्याचाही दावा करण्यात येत आहे. यावरून संपूर्ण राज्यामध्ये उलट-सुलट चर्चा सुरू असताना पिंपरी- चिंचवड महापालिकेतदेखील राजकीयांची उठ-बस वाढली आहे. सोमवारी शिंदे गटाचे खासदार श्रीरंग बारणे यांनी महापालिकेत येत आयुक्त शेखर सिंह यांच्यासोबत बैठक घेतली. त्यांनी सुमारे दीड तास विविध विषयांवर चर्चा केली. तर दुपारी भाजपचे आमदार तथा शहराध्यक्ष महेश लांडगे यांनीही आयुक्तांसोबत सुमारे अडीच तास बंद दाराआड चर्चा केली. सकाळपासूनच दोन्ही नेत्यांच्या कार्यकर्त्यांची महापालिकेमध्ये वर्दळ होती.
महापालिकेमध्ये प्रशासकीय राजवट सुरू आहे. सुरुवातीला महाविकास आघाडीचे सरकार होते. त्यानंतर शिंदे गट व भाजपचे सरकार आले. त्यामुळे महापालिकेच्या कारभारातदेखील सत्ताधारी पक्षाचा हस्तक्षेप वाढला. अनेक कामांच्या निविदा काढल्या. काही कामांची वर्कऑर्डर बाकी आहे. राज्यातील सरकारबाबत पुन्हा काही घडल्यास कामे अडकण्याची भीती राजकीय लोकप्रतिनिधींना असल्याची चर्चा यानिमित्ताने राजकीय वर्तुळामध्ये सुरू आहे.
दिल्लीत बैठका, गल्लीत धसका
गेल्या एक महिन्यापासून राज्यातील सत्तासंघर्षाबाबत सातत्याने चर्चा सुरू आहे. राज्यातील सत्ता समीकरणाबाबत दिल्लीमध्येही बैठका होत आहेत. यावरून महापालिकेतील लोकप्रतिनिधींनीही धसका घेतला आहे. निश्चित काय होईल, याबाबत माहीत नसले तरी रखडलेली कामे मार्गी लावण्यासाठी राजकीयांची उठाठेव सुरू असल्याचे महापालिकेतील वर्दळीवरून दिसून येत आहे.
कोणती आहेत महत्त्वाची कामे?
महापालिकेमध्ये १८ मीटर रस्ते यांत्रिक पद्धतीने सफाई करण्याचे काम बाकी आहे. तसेच नदी सुधारची निविदा काढली असून, त्याला मान्यता घ्यायची आहे. त्यासोबतच जलशुद्धीकरण केंद्र, नाट्यगृह, तारांगण यांचे उद्घाटन बाकी आहे. ही कामे तातडीने मार्गी लावण्यासाठी खासदार, आमदारांनी आयुक्तांकडे मागणी केल्याचे अधिकाऱ्यांनी खासगीत बोलताना सांगितले.