PCMC Election| २५ टक्के नगरसेविका नामधारी; पतीराज महापालिकेत कारभारी
By ऑनलाइन लोकमत | Published: February 24, 2022 12:52 PM2022-02-24T12:52:16+5:302022-02-24T12:56:42+5:30
महापालिकेच्या २०१७ मध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत १२८ नगरसेवक निवडून आले होते...
नारायण बडगुजर
पिंपरी : महापालिकेच्या संकेतस्थळावर नगरसेवक व नगरसेविकांची नावे व संपर्क क्रमांक नागरिकांच्या माहितीसाठी प्रसिद्ध करण्यात आली आहेत. मात्र यातील काही नगरसेविकांच्या नावापुढे त्यांच्या पतीराजांचे मोबाईल क्रमांक प्रसिद्ध केले आहेत. महापालिकेच्या सभागृहात ‘महिलाराज’ असूनही प्रत्यक्षात यातील काही नगरसेविकांच्या नावाने त्यांचे पतीच कारभार करीत असल्याचे दिसून येते. पत्नी प्रभारी आणि पती कारभारी, असा हा प्रकार आहे. याला काही नगरसेविका अपवाद असून त्यांची कार्यपद्धती धडाकेबाज आहे. तसेच प्रभागातील समस्या महापालिकेच्या सभागृहात मांडण्या बाबतही या धडाकेबाज नगरसेविका आघाडीवर असतात. मतदार व शहरवासीयांसोबत अशा नगरसेविकांचा थेट संपर्क देखील आहे.
महापालिकेच्या २०१७ मध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत १२८ नगरसेवक निवडून आले होते. त्यातील चार नगरसेवक मयत झाले. सध्याच्या १२४ नगरसेवकांमध्ये ६३ नगरसेविका आहेत. यातील मोजक्याच नगरसेविकांची कार्यपद्धती धडाकेबाज आहे. तसेच काही नगरसेविकांनी पाच वर्षांच्या कार्यकाळात त्यांच्या प्रभागस्तरावर स्वत:ची ओळख निर्माण केली. मात्र काही नगरसेविका केवळ नामधारी असल्याचे दिसून येते.
लोकप्रतिनिधी आहेत की, ‘रबर स्टॅम्प’?
नगरसेविकांच्या नावे त्यांचे पती कामकाज करीत असल्याचे काही प्रभागात दिसून येते. अशा काही नगरसेविका पाच वर्षांत प्रभागात देखील फिरकल्या नाहीत. त्यामुळे नागरिकांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. लोकप्रतिनिधी आहेत की, ‘रबर स्टॅम्प’, असा प्रश्न संबंधित नगरसेविकांच्या प्रभागातील नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
वारसदारांना केले पुढे-
पतीराजांप्रमाणेच काही नगरसेविकांनी त्यांच्या मुलांना पुढे केल्याचे दिसून येते. या नगरसेविकांनी त्यांच्या मोबाईल क्रमांकाऐवजी त्यांच्या मुलांचा मोबाईल क्रमांक महापालिकेच्या वेबसाईटवर प्रसिद्ध केला आहे. स्वत:ऐवजी मुलांना निवडणूक रिंगणात उतरविणार असल्याने त्यांच्याकडून हा खटाटोप सुरू आहे.
‘त्या’ पतीराजांचा महापालिकेत मुक्त संचार
काही नगरसेविकांनी त्यांचे संपर्क कार्यालय सुरू केले आहे. या कार्यालयात येणाऱ्या नागरिकांना नगरसेविकेऐवजी त्यांच्या पतीकडेच समस्या मांडाव्या लागतात. हे पतीराज महापालिकेत विविध विभागात मुक्त संचार करतात. पत्नी नव्हे तर आपण स्वत:च नगरसेवक आहोत, अशा आविर्भावात हे पतीराज महापालिका, क्षेत्रीय कार्यालय आदी ठिकाणी मिरवतात. आपलाच शब्द प्रमाण मानावा, असा त्यांचा होरा असतो.
उच्चशिक्षित नगरसेविकाही ‘नामधारी’
महापालिकेत भाजपाची सत्ता आहे. यातील भाजपाच्या विद्यमान १३ नगरसेविकांशी संपर्कासाठी त्यांची मुले किंवा पती यांच्या मोबाईलवर फोन करावा लागतो. यात चार नगरसेविकांनी त्यांच्या मुलांचा तर ९ नगरसेविकांनी त्यांच्या पतीचा मोबाईल क्रमांक महापालिकेच्या वेबसाईटवर दिला आहे. यातील यातील काही नगरसेविका उच्चशिक्षित आहेत. तरीही त्यांच्याऐवजी त्यांच्या पतीचाच क्रमांक दिला आहे. त्यामुळे या नगरसेविका केवळ नामधारी असल्याचे दिसून येते.
आजी -माजी पदाधिकारीही आघाडीवर
महापालिकेतील सत्ताधारी भाजपप्रमाणेच विरोधी पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या नगरसेविकांच्याही संपर्क क्रमांकाबाबत हा प्रकार दिसून येतो. राष्ट्रवादीच्या एका नगरसेविकेऐवजी त्यांच्या माजी पदाधिकारी असलेल्या पतीचा संपर्क क्रमांक महापालिकेच्या वेबसाईटवर आहे.
महापालिकेच्या वेबसाईटवर स्वत:चा मोबाईल क्रमांक न दिलेल्या नगरसेविका
- भाजपा - १३
- राष्ट्रवादी - ३
- शिवसेना - १