PCMC: निवडणुकीचा शीण घालवायला कर्मचारी गेले फिरायला; महापालिका अजूनही सुटीच्या मूडमध्ये
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2024 12:03 IST2024-05-23T11:53:58+5:302024-05-23T12:03:43+5:30
पिंपरी : महापालिका कर्मचाऱ्यांची निवडणूक कामकाजासाठी नेमणूक करण्यात आली होती. मात्र, मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर त्यांना मंगळवारी (दि. १४) ...

PCMC: निवडणुकीचा शीण घालवायला कर्मचारी गेले फिरायला; महापालिका अजूनही सुटीच्या मूडमध्ये
पिंपरी : महापालिका कर्मचाऱ्यांची निवडणूक कामकाजासाठी नेमणूक करण्यात आली होती. मात्र, मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर त्यांना मंगळवारी (दि. १४) मुक्त करण्यात आले. आता निवडणुकीच्या कामातून मुक्तता मिळाल्यानंतर शीण घालवण्यासाठी महापालिकेतील अधिकारी व कर्मचारी सुटीवर गेले असून, काहीजण सहलीवर गेल्याचे समजते. त्यामुळे महापालिकेत कामांसाठी आलेल्या नागरिकांना आल्या पावली परत जावे लागत आहे.
लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यानंतर महापालिकेतील विविध कामांसाठी येणाऱ्या नागरिकांची वर्दळ कमी झाली होती. मात्र, मतदान झाल्यानंतर नागरिकांनी विविध समस्यांबाबत महापालिकेत कामांसाठी येण्यास सुरुवात केली आहे. मावळ व शिरूर या दोन लोकसभा मतदारसंघांच्या निवडणूक कामकाजासाठी महापालिकेच्या विविध अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली होती. विधानसभा मतदारसंघनिहाय पिंपरी, चिंचवड आणि भोसरीचे कामकाज अधिकारी, कर्मचाऱ्यांना दिले होते. त्यामुळे सुटीच्या दिवशीही कर्मचाऱ्यांना कामावर यावे लागत होते.
अधिकारी गेले फिरायला....
शहरात पिंपरी, चिंचवड व भोसरी, असे तीन विधानसभा मतदारसंघ आहेत. निवडणुकीच्या कामासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडून महापालिकेचे अधिकारी व कर्मचारी तसेच शिक्षकांची नेमणूक केली होती. मतदान केंद्राध्यक्ष, मतदान अधिकारी, कर्मचारी नेमले होते. मात्र, सोमवारी (दि. १३) मतदान झाल्यानंतर त्यांना यातून मुक्त करण्यात आले आहे. तसा आदेशही महापालिका प्रशासनाने काढला आहे. त्यानंतर काही अधिकारी व कर्मचारी सुटीवर गेले असून, काहीजण सहलीवर गेल्याचे समजते.
मतमोजणीला राज्य शासनाचे कर्मचारी...
मतमोजणी प्रक्रियेसाठी स्थानिक स्वराज्य संस्थेचे कर्मचारी न नेमता राज्य शासनाचे कर्मचारी नेमण्यात येतात. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थेतील कर्मचाऱ्यांना मतदानाच्या दुसऱ्या दिवसांपासून निवडणूक कामकाजातून मुक्त करण्याचे शासनाचे आदेश आहेत. त्यानुसार महापालिकेने आदेश काढत महापालिका कर्मचाऱ्यांना मुक्त केले आहे.
निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार महापालिकेचे अधिकारी व कर्मचारी नियुक्त करण्यात आले होते. मतदान झाल्यानंतर काही कर्मचारी वगळता सगळ्या कर्मचाऱ्यांना निवडणूक कामकाजातून मुक्त करण्यात आले आहे.
-विठ्ठल जोशी, उपायुक्त, महापालिका