PCMC | महापालिकेतील चौथ्या मजल्यावर आग; बचावासाठी थरार अन् सुटकेचा नि:श्वास
By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2023 08:45 PM2023-04-19T20:45:14+5:302023-04-19T20:45:49+5:30
इमारतीत लागलेल्या या आगीवर नियंत्रण मिळताच सर्वांनी सुटकेचा नि:श्वास सोडला....
पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय भवनामधील चौथ्या मजल्यावरील सामान्य प्रशासन विभागाजवळील कक्षाला दुपारी ३ वाजेच्या सुमारास अचानक आग लागली. धुराचे लोट येऊ लागल्याने परिस्थितीचे गांभीर्य पाहून आपत्कालीन व्यवस्थापनामध्ये कार्यरत असलेल्या अधिकाऱ्यांनी विलंब न करता तात्काळ समन्वय साधून सर्व संबंधित यंत्रणांना सूचना दिल्या. सूचना मिळताच सर्व यंत्रणा कार्यान्वित झाल्या. अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी दाखल झाले. महापालिकेमध्ये उपस्थित असलेले साडेसहाशे कर्मचारी व नागरिक अवघ्या आठ मिनिटात पालिकेच्या बाहेर आले. इमारतीत लागलेल्या या आगीवर नियंत्रण मिळताच सर्वांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.
हा सर्व प्रकार घडला तो मॉक ड्रिलच्या निमित्ताने. ‘राष्ट्रीय सुरक्षा सप्ताहाचे’ औचित्य साधून सरकारी कार्यालयाच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून महापालिकेच्या पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय भवनामध्ये संकटकालीन बचाव प्रशिक्षण (फायर मॉक ड्रिल)चे आयोजन केले होते. कार्यालयीन इमारतीत आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी उपलब्ध असलेल्या यंत्रणांमधील आपत्कालीन समन्वय आणि बचाव करण्यासाठी करण्याची कार्यवाही याबद्दल माहिती व्हावी या उद्देशाने बुधवारी (दि. १९) मॉक ड्रिल घेण्यात आले. अग्निशमन दल, पोलिस, सुरक्षा दल तसेच इमारतीतील अधिकारी कर्मचारी आणि नागरिक या मॉक ड्रिलमध्ये सहभागी झाले होते. अग्निशमन दलाचे ३ बंब, २ फायर फायटर मोटार बाइक, २ रुग्णवाहिका, २ पाण्याचे टँकर यांचा वापर या मॉक ड्रिलमध्ये करण्यात आला, तर अग्निशमन, सुरक्षा, पोलिस, आपत्ती व्यवस्थापन दलाचे जवान यात सहभागी झाले होते.
महापालिका इमारतीमध्ये लागलेल्या आगीची सूचना मिळताच अग्निशमन यंत्रणा कार्यान्वित करून त्यांना सूचना देण्यात आल्या. प्रत्येक मजल्यासाठी नेमलेल्या मार्शलने कार्यालयातील सर्व दालनांची तपासणी करून उपस्थितांना इमारतीबाहेर जाण्याच्या सूचना दिल्या. इमारतीमध्ये उपस्थित असणारे ६२७ अधिकारी कर्मचारी आणि ४० नागरिकांना ८ मिनिट ३ सेकंदामध्ये सुखरूप बाहेर काढण्यात आले. सावधानता म्हणून वीजपुरवठा खंडित करण्यात आला. दरम्यान ३ मिनिटांमध्ये अग्निशमन पथक बंबासह घटनास्थळी दाखल झाले. रुग्णवाहिकादेखील दाखल झाल्या. १५ ते २० मिनिटांमध्ये आगीवर नियंत्रण मिळवून संपूर्ण आग विझवण्यात आली.
- विठ्ठल जोशी, उपायुक्त तथा इनसिडेंट कमांडर.