विद्यार्थ्यांच्या विम्याचा महापालिकेला विसर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 30, 2018 01:22 AM2018-09-30T01:22:37+5:302018-09-30T01:23:07+5:30
तरतूद नसल्याने योजना बारगळली : मुलांच्या जिवाची प्रशासनाला नाही पर्वा
पिंपरी : महापालिकेच्या शिक्षण विभागामार्फत २०१६-१७ या शैक्षणिक वर्षामध्ये पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना विमा संरक्षण देण्यात आले होते. ही योजना फक्त एक वर्षापुरती राबवून त्यानंतर बंद करण्यात आली. त्यामुळे शहरातील पालकांमधून नाराजीचा सूर येत आहे.
महापालिकेच्या शाळेमध्ये शिक्षण घेणाऱ्या पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांचा खासगी कंपनीमार्फत विमा काढण्यात आला होता. शाळेत येताना व शाळेतून घरी जाताना तसेच इतरवेळेसही अपघात झाल्यास विद्यार्थ्याच्या औषधोपचारासाठी आर्थिक मदत व्हावी यासाठी शिक्षण मंडळाने हा निर्णय घेतला होता.
त्यामध्ये ३७ हजार ६६४ विद्यार्थ्यांना विमा संरक्षण देण्यात आले होते. प्रत्येक विद्यार्थ्यामागे ४० रुपये घेण्यात आले होते. त्यानुसार १५ लाख पंधरा हजार रुपयांची विमा पॉलिसी काढण्यात आली होती. या शैक्षणिक वर्षामध्ये एकाच विद्यार्थ्याला या विम्याचा फायदा मिळाला असला तरी विद्यार्थ्यांच्या दृष्टीने ही योजना लाभकारक होती. मात्र विमा योजना बंद केल्यामुळे पालकांमधून नाराजी व्यक्त होत आहे. तसेच महापालिका प्रशासनाला विद्यार्थ्यांच्या जिवाची पर्वा नाही का असा सवाल पालक करीत आहेत.
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या शाळेत शिकणाºया विद्यार्थ्यांचा आरोग्य विमा उतरावा, त्यासाठी अंदाजपत्रकात तरतूद करावी, अशी मागणी महापौर राहुल जाधव यांनी केली आहे. याबाबत आयुक्तांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, महापालिकेच्या शाळेत सामान्य कुटुंबातील विद्यार्थी शिक्षण घेतात. विद्यार्थी अचानक आजारी पडल्यास, शस्त्रक्रिया करावी लागल्यास संबंधित कुटुंबास आर्थिक परिस्थितीमुळे उपचाराचा खर्च करणे शक्य होत नाही. त्या वेळी त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. त्यामुळे अशा शालेय विद्यार्थ्यांचा आरोग्य विमा उतरविणे आवश्यक आहे. तरी महापालिकेच्या शाळेत शिक्षण घेत असलेल्या सर्व शालेय विद्यार्थ्यांचा आरोग्य विमा उतरविण्यात यावा. यासाठी अंदाजपत्रकात आवश्यक तरतूद करावी, असे पत्रात म्हटले आहे.
अपघात झाल्यास पालकांना होतो भुर्दंड
या विमा योजनेमुळे विद्यार्थ्याचा अपघात झाला तर त्याच्यावर औषधोपचार करण्यासाठी पालकांना आर्थिक हातभार मिळत होता. राज्य शासनाने पालकांना आर्थिक हातभार लागावा यासाठी २०१३ मध्ये राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह अनुदान योजना सुरू केली आहे. मात्र यासाठी अनेक निकष असल्याने महापालिकेने काढलेल्या पॉलिसीला पालकांची पसंती मिळत होती. विद्यार्थी हे उद्याचे भविष्य आहेत. भविष्यामध्ये हेच विद्यार्थी आपल्या शहराचे राष्ट्रीय व जागतिक पातळीवर प्रतिनिधित्व करणार आहेत. मात्र त्यांच्या सुरक्षेसाठी काढण्यात येणाºया विमा पॉलिसी फक्त एक वर्षापुरत्या राबवून बंद केली. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी व पालकांच्या आर्थिक हातभारासाठी काढण्यात आलेल्या विमा पॉलिसीचा महापालिका प्रशासनाला विसर पडला आहे का, असा सवाल पालक करीत आहेत.