PCMC: कॉम्प्लेक्समध्ये आग लागली तर जबाबदारी कुणाची? व्यापारी संकुलामध्ये फायर ऑडिट करण्याकडे दुर्लक्ष
By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2024 11:44 AM2024-04-22T11:44:10+5:302024-04-22T11:45:01+5:30
फायर ऑडिट करून घेण्याची जबाबदारी सोसायटी आणि विकासक यांची असते. मात्र, ती केली जात नाही. त्यामुळे सावधान अपघात झाल्यास गुन्हा दाखल होऊ शकतो....
पिंपरी :पिंपरी-चिंचवड महापालिका परिसरातील व्यावसायिक इमारतींमध्ये रहिवासी गाळे असतात. त्यासाठी अशा इमारतीमध्ये अग्नी सुरक्षा यंत्रणा उभारणे गरजेचे असते. मात्र, महापालिका परिसरात याबाबत अनास्था आहे. फायर ऑडिटही केले जात नाही. फायर ऑडिट करून घेण्याची जबाबदारी सोसायटी आणि विकासक यांची असते. मात्र, ती केली जात नाही. त्यामुळे सावधान अपघात झाल्यास गुन्हा दाखल होऊ शकतो.
पिंपरी-चिंचवड शहरात मागील काही महिन्यात तळवडे, शाहूनगर, चिखली आदी ठिकाणी भीषण आगीच्या घटना घडल्याची नोंद आहे. त्यात मोठ्या प्रमाणात जीवित व वित्तहानी झाली आहे. पिंपरी-चिंचवड परिसरातील औद्योगिक क्षेत्रात आगीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. महाराष्ट्र आग प्रतिबंधक व जीवसंरक्षक उपाययोजना अधिनियम २००६ व नियम २००९ हे ६ डिसेंबर २००८ नुसार दर सहा महिन्यांनी म्हणजे जानेवारी व जुलै महिन्यात अग्नी प्रतिबंधक सुरक्षा व्यवस्था सुस्थितीत असल्याचा दाखला (फायर ऑडिट) मिळविणे बंधनकारक केले आहे.
कशामुळे लागताहेत आगी
शहरासह संपूर्ण महाराष्ट्रात मार्च महिन्यापासूनच उन्हाचा तडाखा वाढला आहे. या कालावधीत आगीच्या घटनांचे प्रमाण अधिक वाढते. मागील काही वर्षात आगीच्या अनेक गंभीर घटना शहरात घडल्या आहेत. या आगीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात जीवित व वित्त हानी झाली आहे. शहरातील रुग्णालयांसह अन्य आस्थापने व औद्योगिक कंपन्यांचे तातडीने फायर ऑडिट केले जात नाही.
फायर एक्सटिंगग्वीशर लावले आहेत का?
मानवी जीव वेळीच वाचविण्यासाठी आणि वित्त हानी टाळण्यासाठी आगामी दोन महिन्यांमध्ये उन्हाळी ऋतू लक्षात घेऊन महापालिका हद्दीतील व्यवसायाच्या ठिकाणीच रहिवास असल्याचे मिळकतींमध्ये आगीच्या घटनांचा मुकाबला करण्यासाठी फायर एक्सटिंगग्वीशर लावले आहेत का ? लावले असल्यास ते रिकामे अथवा अपुरे आहेत का? आग लागल्यास आगीची माहिती देणारे ऑटोमेटेड फायर अलॉर्म सिस्टम, इत्यादी आवश्यक यंत्रणा कार्यान्वित आहेत का? याबाबतचे फायर ऑडिट करण्याची गरज आहे, अशी मागणी स्थायी समिती माजी अध्यक्षा सीमा सावळे यांनी केली.
घटना वाढल्या
शहरात दररोज १ ते २ आगीच्या घटना घडत असतात. याचे प्रमाण उन्हाळ्याप्रमाणेच आता पावसाळ्यातही आगीचे प्रमाण जास्त आहे. त्यात शॉर्टसर्किट व गॅस गळतीचे प्रमाण जास्त आहे. शहरात गेल्या वर्षभरात तब्बल १ हजार ७९ आगीच्या घटना घडल्या त्यात सर्वाधिक ७६० घटना या घरांमध्ये अथवा दुकानांमध्ये लागलेल्या आगीच्या होत्या.
गेल्या आठवड्यातच भोसरी एमआयडीसीत कंपनीला तसेच मोशीतील मेडिकलमध्ये आग लागली होती. प्रामुख्याने दुकानात, घरात शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या आगीचे प्रमाण मोठे आहे. एकदा घर अथवा दुकान घेतल्यानंतर आपण अनेक वर्षे घरातील वायरिंगकडे लक्ष देत नाही. मात्र, घर, दुकानातील इलेक्ट्रॉनिक्स उपकरणे दरवर्षी वाढत जातात. त्यातून आगीच्या घटना घडतात.
रात्री-अपरात्री अचानक विजेचा दाब वाढण्याची शक्यता असते. त्यातून वायरिंग जळून शॉर्ट सर्किट होतो व आग लागून होत्याचे नव्हते होते. त्यामुळे काही वर्षांनी घरातील तसेच दुकानातील वायरिंग व्यवस्थित आहे का, वापरली जाणारी इलेक्ट्रॉनिक उपकरणांना लागणारी विजेचा दाब या वायरी सहन करू शकतात का, याची तपासणी करणे गरजेचे आहे.
घरात अथवा दुकानात कन्सिल वायरिंग केलेली असते. त्यामुळे या वायरींची स्थिती काही वर्षांनी कशी आहे हे समजू शकत नाही. वायरिंगचा विजेचा दाब सहन करण्याची क्षमता किती, आपण त्यावर किती विजेचा दाब टाकत आहोत. या कधीही दुकानदार, घरातील व्यक्ती विचार करीत नाहीत. तसेच त्यामुळे ओव्हरलोड झाल्यावर या वायरींची क्षमता कमी होते. त्यात आतल्या आत जळून जाण्याची शक्यता वाढते.
ज्या ठिकाणी व्यावसायिक इमारतीमध्ये रहिवासी क्षेत्र आहे, त्याचे फायर ऑडिट करणे गरजेचे आहे. ही जबाबदारी आस्थापनांची आहे. ते न केल्यास गुन्हा दाखल होऊ शकतो. याबाबतचे सर्वेक्षण सुरू आहे.
- मनोज लोणकर, उपायुक्त.