PCMC | मिळकतकरात पुण्यात सवलत पण पिंपरी-चिंचवड महापालिकेचा ठेंगा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2023 02:46 PM2023-03-21T14:46:39+5:302023-03-21T14:47:57+5:30

पीएमसीतील सात लाख मिळकतधारकांचा दोनशे कोटींचा कर माफ झाला...

PCMC Income tax concession in Pune but Pimpri-Chinchwad Municipal Corporation | PCMC | मिळकतकरात पुण्यात सवलत पण पिंपरी-चिंचवड महापालिकेचा ठेंगा

PCMC | मिळकतकरात पुण्यात सवलत पण पिंपरी-चिंचवड महापालिकेचा ठेंगा

googlenewsNext

पिंपरी :पुणे महापालिकेच्या वतीने मिळकतकरात चाळीस टक्के सवलत देण्याची योजना कसबा विधानसभेत फटका बसल्यानंतर सुरू करण्यात आली. सात लाख मिळकतधारकांचा दोनशे कोटींचा कर माफ झाला आहे. मात्र, पिंपरी-चिंचवड महापालिकेत सवलत योजना नसल्याने नागरिकांना आर्थिक फटका बसत आहे. सहा लाख नागरिकांना सवलत योजनेत समाविष्ट करून लाभ कधी मिळणार, याबाबत प्रतीक्षा आहे.

पुणे महापालिकेत स्वत:च्या मालकीच्या घरात राहत असल्यास मिळकत करात ४० टक्के सवलत मिळत होती. मात्र, २०१८ मध्ये ही सवलत रद्द केली. याचा फटका ९७ हजार ५०० मिळकतधारकांना बसला. पुणे महापालिका हद्दीत १ एप्रिल २०१९ पासून नव्याने समाविष्ट झालेल्या मिळकतधारकांना चाळीस टक्के कर सवलत १ लाख ६७ हजार मिळकतधारकांना मिळाली नाही. त्यानंतर पाच लाख मिळकतधारकांची ही सवलत काढण्याचे काम सुरू होते. आता मिळकत करात चाळीस टक्के सवलत कायम ठेवल्याचा फायदा पुण्यातील साडेसात मिळकतींना होणार आहे. त्यामुळे दोनशे कोटी रुपये नागरिकांचे वाचणार आहेत.

कसब्यातून धडा घेतला...

कसबा विधानसभेच्या मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचे रवींद्र धंगेकर यांनी भाजपचे हेमंत रासने यांचा पराभव केला. या निवडणुकीत मतदारांनी भाजपला धडा शिकवला. या निकालानंतर पुणेकरांना मिळकत करात चाळीस टक्के सवलत देण्याबाबत हालचाली सुरू केल्या. त्याबाबतचा निर्णय राज्य सरकारने घेतलेला आहे. मात्र, पिंपरी-चिंचवडमध्ये ही योजना नाही, तसेच याबाबत कोणी आग्रहीही नाही. त्याचा आर्थिक फटका पिंपरी-चिंचवडकरांना बसत आहे.

पिंपरी-चिंचवड शहरात ५ लाख ९२ हजार मिळकती आहेत. मिळकतींना महापालिकेच्या करसंकलन विभागाच्या वतीने कराची आकारणी करण्यात येत असते. नागरिकांना कर भरण्यासाठी शहराच्या विविध भागांत कर संकलन विभागाची १७ केंद्रे आहेत. कर ऑनलाइन भरण्याची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे. शास्तीकरात सवलत दिल्याने त्याचा फायदा एक लाख नागरिकांना झाला आहे. त्यामुळे महापालिकेचे उत्पन्न सातशे कोटींवर पोहोचले आहे.

दिलासा कधी मिळणार?

मिळकत करात चाळीस टक्के सवलत देण्याची योजना पुणे महापालिकेत आहे. मात्र, ही योजना पिंपरी महापालिकेत नसल्याने नागरिकांना लाभ होत नाही. महागाईने त्रस्त असणाऱ्या पिंपरी- चिंचवडकरांना दिलासा देण्यासाठी सवलत योजना सुरू करावी, अशी मागणी होत आहे.

Web Title: PCMC Income tax concession in Pune but Pimpri-Chinchwad Municipal Corporation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.