PCMC | महापालिका अधिकाऱ्यांचे काय झाडी, काय डोंगार....
By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2022 01:08 PM2022-07-16T13:08:55+5:302022-07-16T13:11:12+5:30
एका बैठकीवर सव्वा दोन लाखांचा खर्च...
पिंपरी : महापालिकेच्या वतीने स्वच्छ सर्वेक्षण मोहीम राबवण्यात येत आहे. याच स्वच्छ सर्वेक्षण २०२३ अंतर्गत टूलकिट कामकाजासंदर्भात कार्यशाळा आयोजित केली आहे. ही कार्यशाळा ऑटो क्लस्टर सोडून थेट लोणावळ्याच्या पंचतारांकित हॉटेलमध्ये होईल. शहरातील हॉटेल तसेच सभागृह सोडून लोणावळ्याला अधिकारी वर्षाविहारासाठीच जात असल्याची चर्चा यानिमित्ताने रंगली आहे. पावसाळी पर्यटनासाठी देशभरातून लोणावळ्याला येत काय झाडी, काय डोंगार अनुभवणाऱ्या पर्यटकांप्रमाणे महापालिका प्रशासनाला त्याचा मोह आवरता आला नसल्याची चर्चा यानिमित्ताने महापालिका वर्तुळात रंगली आहे.
स्वच्छ सर्वेक्षण २०२३ अंतर्गत टूलकिट कामासाठी महापालिकेचे आयुक्त, अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी बैठकीचे आयोजन केले आहे. शनिवारी (दि. १६) सकाळी ९ ते सायंकाळी ५ या वेळेत लोणावळ्यातील द फर्न या पंचतारांकित हॉटेलमध्ये ही कार्यशाळा होणार आहे. या बैठकीसाठी आयुक्त राजेश पाटील, अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, जितेंद्र वाघ, उल्हास जगताप यांच्यासह आरोग्य अधिकारी, क्षेत्रीय अधिकारी, सहायक आरोग्याधिकारी, मुख्य आरोग्य निरीक्षक, आरोग्य निरीक्षक, लघुलेखक, मुख्य लिपिक, कॉम्प्युटर ऑपरेटर, सल्लागार प्रतिनिधी असे तब्बल ७० अधिकारी, कर्मचारी उपस्थित असतील. या बैठकीसाठी महापालिकेतील अधिकारी, कर्मचाऱ्यांचा मोठा ताफा लोणावळ्याकडे शनिवारी (दि.१६) सकाळी रवाना होणार आहे. या ताफ्यात ३० चारचाकी वाहनांचा समावेश असणार आहे. त्यासोबत तीस चालकदेखील असणार आहेत.
महापालिकेच्या विविध कामकाजासह स्मार्ट सिटीच्या बैठका ऑटो क्लस्टर येथे पार पडतात. तसेच शहरामध्ये भोसरी, चिंचवड, पिपळे गुरव याठिकाणी पालिकेचे नाट्यगृह आहेत. या ठिकाणी कार्यशाळा घेतली असती तर खर्चही वाचला असता.
एका बैठकीवर सव्वा दोन लाखांचा खर्च
महापालिकेच्या सत्तर अधिकारी कर्मचाऱ्यांसह ३० चालकांना चहा, नाश्ता व जेवणाची सोय करण्यात येणार आहे. यासह हॉल, स्क्रीनसह प्रोजेक्टर व माईक सिस्टीम यासाठी २ लाख ३३ हजार रुपयांचा खर्च केला जाणार आहे. महापालिकेच्याच एखाद्या सभागृहामध्ये ही कार्यशाळा आयोजित करणे प्रशासनाला शक्य होते.